satyaupasak

HMPV व्हायरस: भारतातील लहान मुलांना किती धोका? महामारीचं रूप घेण्याची शक्यता कितपत?

HMPV Virus India: एचएमपीव्ही व्हायरसमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. चीनमध्ये नेमकं काय घडत आहे, भारतातील लहान मुलांसाठी याचा किती धोका आहे? एचएमपीव्ही व्हायरसामुळे नेमकं काय परिणाम होत आहेत?

मुंबई: तब्बल दोन वर्षे संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या आणि लाखो लोकांचे जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता जगावर पुन्हा एकदा नव्या संकटाचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसचा उद्रेक झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाप्रमाणे हा व्हायरस पुन्हा जगभर पसरतो का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान, भारतातील बंगळुरु शहरात HMPV व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्याने अनेकांच्या मनात काळजीचे सावट पसरले आहे. भारतात पुन्हा लॉकडाऊन लागू होईल का, अशा चर्चा रंगल्या आहेत.

एचएमपीव्ही व्हायरस भारतासाठी फारसा गंभीर धोका ठरणार नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. सध्या चीनमधील मास्क घालून फिरणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमधील प्रदूषणाच्या समस्येमुळे तिथे मास्क घालणे सामान्य गोष्ट आहे. एचएमपीव्ही व्हायरस मुख्यत्वे लहान बालकांना आणि खूपच जास्त वयाच्या व्यक्तींना होण्याचा धोका असतो. परंतु, गंभीर आजार होण्याची शक्यता फार कमी असल्याचे डॉ. रवी गोडसे यांनी नमूद केले आहे.

चीनमध्ये अशी परिस्थिती का? एचएमपीव्ही व्हायरस अत्यंत धोकादायक ठरत असेल, तर चीनसारख्या प्रगत देशात लहान मुले मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात का दाखल होत आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले की, चीनमध्ये कोरोनाच्या काळात झिरो कोव्हिड पॉलिसी होती. त्या काळात जन्मलेली मुले फारशी घराबाहेर पडली नाहीत. त्यामुळे त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीचा विकास झालेला नाही. परिणामी, त्यांना HMPV व्हायरस झाल्यानंतर ती गंभीर आजारांना बळी पडत आहेत.

भारतातील लहान मुलांना HMPV व्हायरसचा धोका कमी का? भारतात कोरोनाच्या काळात चीनसारखा कठोर लॉकडाऊन नव्हता. त्यामुळे येथील लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे HMPV व्हायरस भारतात फारसा प्रादुर्भाव करणार नाही, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले. HMPV व्हायरससाठी सध्या कोणताही विशेष उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, 2027 पर्यंत या व्हायरसचे पूर्ण उच्चाटन होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *