आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून बाहेर काढलं असतं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे.
Nitin Deshmukh : आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून बाहेर काढलं असतं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे. अकोल्यातील जन आक्रोश मोर्चामध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख सहभागी झाले होते. यावेळी बोलताना देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.
धनंजय मुंडे मंत्रीपदावर राहिले तर त्याचा लाभ वाल्मिक कराडला होईल. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा मित्र असून धनंजय मुंडे यांचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. महाभारतातील कर्णाप्रमाणेच धनंजय मुंडे त्याच्या मित्राला साथ देतील, अशी शंका नितीन देशमुख यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड गरम झाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच या हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे.
धनंजय मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या शिबिरात वाल्मिक कराड याच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या सर्व आरोपांना खोटं ठरवत मुंडे यांनी ते निराधार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यामुळेच मोठा झाल्याचा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्रिपद राहिल्यामुळेच जिल्ह्याची परिस्थिती वाईट झाली आहे. “वाल्मिकला कोणी मोठं केलं? तो कोणाचा माणूस आहे? धनंजय मुंडेंमुळेच त्याला वाढ मिळाली,” असं प्रकाश सोळंके यांनी ठामपणे म्हटलं आहे.