Pratap Sarnaik : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री पद मिळाल्यानंतर सरनाईक पहिल्याच दिवशी कार्यरत स्थितीत आलेले दिसले.
Pratap Sarnaik मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री पद मिळाल्यानंतर सरनाईक पहिल्याच दिवशी कार्यरत स्थितीत आलेले दिसले. प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत आपला पहिला निरीक्षण दौरा करत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. दरम्यान डेपोतील निष्काळजीपणा आणि अस्वच्छतेच्या स्थितीवर सरनाईक यांनी पहिल्याच दिवशी असंतोष व्यक्त केला.
त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 फेब्रुवारी रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा आणि आगार कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी दिलेल्या सूचनांचा अद्यापही प्रत्यक्षात अंमल न झाल्यामुळे सरनाईक यांनी खोपट एसटी डेपोतील अधिकाऱ्यांना चांगलीच ताकीद दिली. यावेळी पहिल्या दिवशी कारवाई करणे योग्य नसल्याने एक महिन्याचा कालावधी दिल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मंत्रीपद ही श्रद्धा आणि सबुरीचे फळ असल्याची भावना सरनाईक यांनी व्यक्त केली.
शिवसेनेला नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे-
शिवसेना शिंदे गटाकडून 11 आमदारांनी गेल्या आठवड्यात नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही महत्त्वाची खाती; तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा मंत्रालये देण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शालेय शिक्षण यासारखी महत्त्वाची खाती अनुक्रमे प्रकाश आबिटकर आणि दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. भरत गोगावले यांच्याकडे परिवहन, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता, संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण, पर्यटन, खाणकाम, शंभूराज देसाई यांच्याकडे माजी सैनिक कल्याण आणि संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कॅबिनेट मंत्रिपदांव्यतिरिक्त, पक्षाला राज्यमंत्रीपदेही मिळाली आहेत. आशिष जैस्वाल यांच्याकडे वित्त आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार, तर योगेश कदम यांच्याकडे गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्यांचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. नवीन सरकारमध्ये नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शिवसेनेला मिळाले आहेत. शिवसेनेने पाच जणांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, तर तीन जणांना मंत्रिमंडळातून वगळले आहे.