लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यातील सन्मान रक्कम आता महिलांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना 1500 रुपये मिळतील. दरम्यान, निवडणुकीआधी महायुतीने सत्तेत आल्यास 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना नेमकी किती रक्कम मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टता केली आहे.
लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यात नेमकी किती रक्कम मिळणार?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थसंकल्पीय बजेट जेव्हा पुढील वर्षी सादर होईल, त्यावेळी 2100 रुपये देण्याबाबत विचार करण्यात येईल. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये थांबलेला लाभ आता वितरित होत आहे. त्याची सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातील लाभ महिलांना मिळाला आहे. डिसेंबर महिन्याच्या लाभाचे वितरणही सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पोहचेल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
नव्या नोंदणीची सुरुवात कधी होणार?
नवीन लाभार्थींच्या नोंदणीची प्रक्रिया काही ठिकाणी रखडल्याचे दिसते. यावर आदिती तटकरे यांनी एबीपी माझाला माहिती दिली. “नोंदणीची शेवटची मुदत 15 ऑक्टोबर होती. 15 ऑक्टोबरपर्यंत अडीच कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. अद्याप नवीन नोंदणी सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. सध्यातरी नोंदणी केलेल्या महिला, पात्र महिलांपर्यंत सन्मान निधी पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित आहे. ज्या महिलांचे अर्ज मान्य झाले आहेत, पण आधार लिंकिंगच्या कारणाने लाभ मिळालेला नाही, त्या महिलांना लाभ मिळवून देण्यावर सध्या काम सुरू आहे,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
सरसकट अर्जांची पडताळणी होणार का?
लाभार्थी महिलांचा अंदाजित आकडा आणि नोंदणीची संख्या लक्षात घेऊन, नोंदणी सुरू करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. तक्रारी आल्यास संबंधित अर्जांची पडताळणी होईल. मात्र, सरसकट अर्ज पडताळणी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आलेला नाही.