मंत्री धनंजय मुंडेंवर वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचा विरोधकांचा आरोप
पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असून देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपास सुरू आहे. त्यातच, आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik Karad) आज सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सीआयडीने त्याला अटक केली आहे. पुणे सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराडची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी बीड सीआयडीचे डीवायसी आहेत, जे या गुन्ह्याचा तपास करत आहेत, त्यांच्याकडे कराडची रवानगी करण्यात आली आहे. या अटकेनंतर प्रथमच सीआयडीचे (CID) पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. कारण, वाल्मिक कराडने शरणागती पत्कारण्यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली असून स्वत:च्या खासगी कारने तो सीआयडी कार्यालयात हजर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, पोलिसांना तो फरार असताना सापडला कसा नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. आता, सीआयडी पोलिसांनी प्रथमच याबाबत माहिती दिली.
आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान केस पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातल्या एफआयआर क्रमांक 638/2024 च्या संदर्भात आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडी मुख्यालयात हजर झाला आहे. त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतले असून त्याची थोडीफार चौकशी करून त्याला बीडकडे रवाना करण्यात आले आहे. आरोपी वाल्मिक कराडला आमच्या टीमसह बीडचे तपासी अंमलदार, बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यासाठी बंदोबस्तात बीडकडे रवाना करण्यात आले असल्याचे सारंग आव्हाड यांनी सांगितले. तसेच, पुढील तपास गुजर हेच करतील, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, सीआयडी पोलिसांनी या घटनेवर अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की फार काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यावर जायचे नाही. त्याचे समर्थन करायचे नाही आणि विरोधही करायचा नाही. विरोधकांनी राजकारण करत राहावे. मात्र, आमची भूमिका स्पष्ट आहे की, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही मिळवून देणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.