satyaupasak

Maharashtra AI Policy: महाराष्ट्रात क्रांती घडणार, पहिले एआय धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलारांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश

मंत्री आशिष शेलार यांनी विभागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, एआय तंत्रज्ञानाचं युग सुरू झाले आहे.

मुंबई : सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आता सॉफ्टवेअर आणि एआयचा काळ सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आयटी क्षेत्र ज्या गतीने वाढले, त्याच गतीने या क्षेत्रात क्रांती होत असल्याचे पाहायला मिळते. डिजिटलायजेशननंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले एआय (AI) (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज विभागाला दिले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे भाग घेऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर आज माहिती व तंत्रज्ञान विभागाचा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा घेतला. या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आशिष शेलार यांनी विभागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना सांगितले की, एआय तंत्रज्ञानाचं युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे. मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय मिशन’ अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी ₹10,372 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे.

AI मध्ये महाराष्ट्र अग्रणी राहावा दरम्यान, केंद्र सरकार जानेवारी 2025 पासून वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे. त्यामुळे स्टार्टअप्स, कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधक ॲप्स विकसित करण्यासाठी, विविध भाषांची सेवा देण्यासाठी तसेच विशेष सेवा प्रदान करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. आपला देश तंत्रज्ञानाच्या आघाडीवर प्रगती करत असताना महाराष्ट्र यात अग्रणी राहिला पाहिजे, असेही अ‍ॅड. शेलार यांनी यावेळी म्हटले. महाराष्ट्रातील बारामतीमध्ये एआयवर आधारित शेतीचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे, एआय हे तंत्रज्ञान वापरून विविध क्षेत्रांमध्ये बदल व क्रांती घडवता येऊ शकते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *