कोल्हापूर, दि. 14 : नाताळ व ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक २ कोल्हापूर यांनी हिरलगे, तालुका गडहिंग्लज येथे अवैध गोवा दारूच्या वाहुतुकीच्या कारवाईत ७ लाख ७२ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 कोल्हापूरचे निरीक्षक संजय शिलेवंत यांनी दिली.*
राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक (दक्षता व अंमलबजावणी) प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार तसेच अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक २ कोल्हापूर (गडहिंग्लज) या पथकास दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी मिळालेल्या माहितीनुसार आजरा गडहिंग्लज रोडवर अवैध गोवा दारू वाहुतुकीचा शोध घेत असता हिरलगे फाटा, हिरलगे तालुका गडहिंग्लज येथे अवैध गोवा बनावटी विदेशी मद्याची विना परवाना तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली व महाराष्ट्र शासनचा कर बुडवून बेकायदेशीर वाहतूक करीत असताना महिन्द्रा कंपनीची स्कोर्पिओ वाहन क्रमांक एमएच 04 डिएन 8555 हे वाहन जप्त केले. या वाहनामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्य गोल्ड & ब्लॅक XXX रमचे ७५० मिलीचे एकूण ४० बॉक्स व गोल्डन एस ब्लु फाईन व्हिस्की ७५० मिलीचे एकूण ३० बॉक्स असे एकूण ७० बॉक्स मिळून आले.
या स्कोर्पिओ वाहनाचे वाहनचालक शैलेश विलास तारी राहणार जुना बाजार, सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यात मिळून आलेल्या वाहनासह मुद्देमालाची किंमत ७ लाख ७२ हजार ४०० इतकी आहे. या छापा पथकात निरीक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत व संदीप जाधव तसेच जवान सर्वश्री देवेंद्र पाटील, आदर्श धुमाळ, आशिष पोवार, सुशांत पाटील महिला जवान ज्योती हिरे यांचा सहभाग असून या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक संदीप जाधव हे करीत आहेत.