पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात दूरदृष्टीचा अभाव? भविष्यातील पुण्यासाठी आजच नियोजनाची गरज!
वाढते पुणे आणि वाढणाऱ्या समस्या; ट्रॅफिक, सांडपाणी आणि पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय शोधण्याची वेळ!!!
सत्यउपासक विशेष लेख
पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने विस्तारत असून वाढती लोकसंख्या, प्रचंड प्रमाणात निर्माण होणारे सांडपाणी, पाणीटंचाईचा वाढता धोका आणि असह्य ट्रॅफिक या समस्या भविष्यात अधिक गंभीर स्वरूप धारण करणार असून शहराचा विकास दर वेगाने वाढत असताना त्या तुलनेत आवश्यक पायाभूत सुविधा विकसित होत नसल्याने नागरी व्यवस्थापनावर प्रचंड ताण निर्माण होत आहे. विशेषतः गेल्या दशकभरात शहरातील वाहनांची संख्या दोन हजार पट वाढली मात्र त्या प्रमाणात रस्त्यांची रुंदी आणि नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण झालेले नाही हे वास्तव आहे, याचबरोबर वाहनांची संख्या कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीमध्ये शाश्वत, व्यापक आणि प्रभावी सुधारणा करण्यातही अपेक्षित यश आलेले नाही. परिणामी वाहतूक कोंडी, नदीप्रदूषण आणि पाण्याची टंचाई या तिन्ही समस्या एकाच वेळी शहरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या महानगरासाठी दूरदृष्टी, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि एकात्मिक नागरी नियोजन यांची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून ठोस धोरणात्मक आणि आर्थिक नियोजन करण्यात येणे अत्यावश्यक आहे.
पुणे शहराला खडकवासला ते मुंढवा असा भौगोलिक दृष्ट्या लाभलेला विस्तृत सलग नदीप्रवाह हा निसर्गाचा वरदान आहे, परंतु आजवर शहराला निसर्गाने दिलेल्या या अमूल्य संपत्तीचा उपयोग केवळ दुर्लक्षितच राहिला असून धोरणकर्त्यांच्या दूरदृष्टी हीन धोरणांमुळे शहराने सर्वांगीण आणि पर्यावरणपूरक विकासाच्या मोठ्या संधीही गमावल्याचे दिसून येते, जर या नदीप्रवाहाचा दूरदृष्टीने उपयोग करून जलवाहतूक, नदी संवर्धन आणि पाणी व्यवस्थापन यांचा समन्वय साधला गेला, तर पुणे शहराला ट्रॅफिकमुक्त, प्रदूषणमुक्त आणि निसर्गसंपन्न शहरी विकासाचा एक नवा मार्ग खुला होऊ शकतो; अन्यथा उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर न केल्यामुळे भविष्यातील नागरी समस्यांचे ओझे अधिकच वाढत राहील.
खडकवासला ते मुंढवा स्वच्छ नदीपात्र, जलवाहतूक तसेच ट्रॅफिक आणि पाणीटंचाईमुक्त पुण्यासाठी दूरदृष्टीचा प्रस्ताव!
सध्या पुणे शहरातील सर्वात मोठ्या नागरी समस्यांपैकी एक समस्या सांडपाणी व्यवस्थापन असून शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्रातील वाढ यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीप्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे, त्यामुळे शहरातील सांडपाणी, मलनिस्सारण प्रकल्पांतून येणारे पाणी तसेच औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारे सांडपाणी हे थेट नदीप्रवाहात सोडण्याऐवजी स्वतंत्र आणि नियोजित प्रणालीद्वारे वेगळ्या पद्धतीने वाहून नेण्याची व्यवस्था करण्याची गरज असून या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून खडकवासला ते मुंढवा जॅकवेल तसेच झायका सारख्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी बंदिस्त आणि स्वतंत्र सांडपाणी निचरा प्रणाली विकसित करून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच ते पाणी नदीपात्रात सोडले गेले, तरच शहरातील नदीपात्र स्वच्छ ठेवणे शक्य होईल. तसेच नदीतून पुढे वाहून जाणारे पाणी आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे सासवड–जेजुरी परिसरातील शेतीसाठी वापरण्यात येणारे पाणीही प्रदूषणमुक्त राहण्यास मदत होईल.
पावसाळ्यात पुणे शहरासह खडकवासला, पानशेत आणि भाटघर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या धरणांमध्ये साठलेले अतिरिक्त पाणी पुढे धरणांतून सोडले जाते आणि ते पुणे शहरातील नदीपात्रातून वाहत उजनी धरणाकडे जाते. उजनी धरण भरल्यानंतर हे पाणी पुढे नदीमार्गे सोडले जाते. मात्र पावसाळ्याचा काळ असल्याने शहरात तसेच ग्रामीण भागात शेतीसाठी सिंचनाची तातडीची आवश्यकता नसते. परिणामी हे मोठ्या प्रमाणातील पाणी कोणत्याही ठोस वापराशिवाय पुढे वाहून जाते आणि त्याचा शहरातील लोकवस्तीला किंवा स्थानिक पाणीपुरवठ्याला फारसा उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत जर मांजरी परिसरात धरण किंवा बंधारा उभारण्यात आला, तर या अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्याचा साठा करता येऊ शकतो. त्यामुळे भविष्यात वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना होण्यास मदत होऊ शकते, खडकवासला ते मुंढवा हे अंतर साधारणपणे ५० किलोमीटरच्या आसपास असून या संपूर्ण पट्ट्यात स्वच्छ आणि स्थिर जलपातळी राखण्याकरिता मुंढवा किंवा मांजरी परिसरात नवीन मोठे अथवा लघुधरण उभारले गेले, तर पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासोबतच अतिरिक्त पाण्याचा साठा करणे शक्य होईल. यामुळे शहराच्या भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, विशेष म्हणजे उजनी धरणाचे क्षेत्रफळ साधारण ३४ किलोमीटरच्या आसपास असताना खडकवासला ते मुंढवा हा नदीपात्राचा पट्टा जवळपास ५० किलोमीटरचा आहे. या विस्तृत पट्ट्यात पाणी साठवणूक, नदी स्वच्छता आणि जलवाहतूक या तिन्ही बाबींचा समन्वय साधला गेला, तर भविष्यातील पुणे ट्रॅफिकमुक्त, पर्यावरणपूरक आणि पाणीटंचाईमुक्त शहर म्हणून विकसित होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशा पद्धतीने या संपूर्ण नदीपात्रात स्वच्छ आणि स्थिर जलपातळी राखली गेल्यास जलवाहतूक हा शहरातील पर्यायी प्रवासी वाहतुकीचा प्रभावी मार्ग ठरू शकतो. शहरातील मेट्रो, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला जलवाहतुकीशी जोडून बहुआयामी वाहतूक प्रणाली विकसित केली गेल्यास मोठ्या प्रमाणात नागरिक जलवाहतुकीचा पर्याय स्वीकारू शकतात. त्यामुळे रस्त्यांवरील ताण कमी होऊन ट्रॅफिक समस्येवर दीर्घकालीन उपाय मिळू शकतो, यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन संबंधित शासकीय विभाग आणि राज्यकर्त्यांशी समन्वय साधत हा उपक्रम राबवणे अत्यंत आवश्यक आहे.
याचबरोबर भविष्यातील शहरी वाहतूक व्यवस्थेचा विचार करताना केवळ रस्ते आणि फ्लायओव्हर यापुरते मर्यादित न राहता जलवाहतूक, ड्रोन ट्रान्सपोर्ट आणि एअर-स्पेस ट्रान्सपोर्टेशन यांसारख्या आधुनिक पर्यायांचाही विचार करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने कुरिअर सेवा, फूड डिलिव्हरी, औषध पुरवठा यांसारख्या सेवांचा विस्तार हवेतून करण्यात आला, तर रस्त्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
परंतु पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकात वाहतूक नियोजन व विविध पायाभूत प्रकल्पांसाठी तब्बल ७४०.४० कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली असून त्याअंतर्गत उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, बोगदे, नदीवरील पूल, पादचारी भुयारी मार्ग तसेच वाहतूक व्यवस्थेचे तांत्रिक नियोजन यांसारखी अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात मुंढवा–महात्मा फुले चौक ग्रेड सेपरेटर, चांदणी चौक–भुगाव रस्ता विकास व उड्डाणपूल (२५ कोटी), साखर संकुल ते संचेती चौक उड्डाणपूल (१५ कोटी), वनाज ते चांदणी चौक मेट्रो प्रकल्पासोबत अॅमिनिटी स्पेसवर पार्किंग विकास, सिंहगड रस्ता–सातारा रस्ता जोडणारा तळजाई–पाचगाव बोगदा, कोथरूड–पाषाण जोडणारा पंचवटी बोगदा (१५ कोटी), शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा मुठा नदीवरील पूल (१५ कोटी), तसेच खडकी छावणी परिसरातील पुणे–मुंबई रेल्वे मार्गाखालील दोन भुयारी मार्गांचे रुंदीकरण आणि नगर रोड व सोलापूर रोडवरील पादचारी भुयारी मार्ग यांसारख्या कामांचा समावेश आहे. याशिवाय ९९ उड्डाणपूल, पूल, सबवे व अंडरपास यांचे GIS मॅपिंग व स्ट्रक्चरल ऑडिट, नगर रोड परिसरातील सुमारे १४० कि.मी. रस्ते जाळे व १२१ जंक्शन्सचा ट्रॅफिक मायक्रोसिम्युलेशन अभ्यास, तसेच शहरातील पार्किंग आरक्षणांचे GIS मॅपिंग यांसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्पही प्रस्तावित आहेत.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठीसुद्धा २७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून स्वच्छ व प्रदूषणमुक्त नदी, नदीकाठ नागरिकांसाठी खुला करणे आणि पूरवाहन क्षमता वाढविणे ही उद्दिष्टे सांगितली जात आहेत. पुणे शहरातील मुळा, मुठा व मुळा-मुठा नदीची एकूण ४४ किलोमीटर लांबी असून सुमारे ४७२७ कोटी रुपयांचा प्रकल्प ११ टप्प्यांत राबविण्याची योजना आहे. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पांतर्गत नैसर्गिक नदीकाठावरील झाडांची तोड करून कृत्रिम पद्धतीने वृक्षारोपण, नदीच्या नैसर्गिक रचनेत बदल करून खडी-वाळू व इतर खनिज संपत्तीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर भराव टाकणे अशी कामे होत असल्याने त्यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या कृत्रिम संरचनांच्या भविष्यातील देखभाल खर्चाचा ठोस अंदाज नसल्याने हा खर्च हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जाण्याची शक्यता असून पावसाळ्यात नदीतील पाणी पातळी वाढल्यावर संपूर्ण संरचना विस्कळीत होण्याचाही धोका नाकारता येत नाही. विशेष म्हणजे पुणे शहराला खडकवासला ते मुंढवा असा विस्तृत आणि सलग नदीप्रवाह लाभलेला असताना, जो भविष्यातील जलवाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, तरीही महानगरपालिकेच्या या अंदाजपत्रकात जलवाहतूक विकसित करण्यासाठी एकाही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही, ही बाब शहराच्या दीर्घकालीन वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत आश्चर्यकारक आणि न उमजण्याजोगी असल्याचे वाटते.