राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील तब्बल १० हजारांहून अधिक पदे भरतीस मंजुरी; उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेस चालना
मुंबई : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालये आणि अभियांत्रिकी संस्थांतील रिक्त शिक्षक व शिक्षकेतर पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत यास मान्यता देण्यात आली.
या बैठकीत लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठासाठी १०५ अध्यापकीय पदे, एक शिक्षक समकक्ष पद आणि आठ कोटी रुपयांचा प्रशासकीय खर्च मंजूर करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठासाठी ६०३ पदांचा सुधारित आकृतिबंधही मान्य करण्यात आला आहे.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये ७८८ शिक्षक व २,२४२ शिक्षकेतर पदे, तर उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील ५,०१२ पदे भरण्याला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
याशिवाय व्ही.जे.टी.आय व गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेडसह सर्व अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीसही मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या आढावा बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे राजगोपाल देवरा, संचालक शैलेंद्र देवळाणकर, विनोद मोहितकर, अशोक गाडेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.