Rupee At All-Time Low: रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण होत असून 17 डिसेंबरच्या सत्रात एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य प्रथमच 84.93 रुपयांपर्यंत घसरले आहे. आज रुपयामध्ये सहा पैशांची घसरण नोंदवली गेली आहे. डॉलरच्या तुलनेत सतत घसरत असलेल्या रुपयामुळे आता भारतीय चलन 85 रुपयांची पातळी गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सोमवारी, 16 डिसेंबर 2024 रोजी वाणिज्य मंत्रालयाने निर्यात-आयात संबंधित डेटा जाहीर केला. या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात भारताची व्यापार तूट सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. आयातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने व्यापार तूट अधिकच वाढली असून, दुसरीकडे निर्यात घटल्याचे दिसून आले.
नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या आयातीत विक्रमी वाढ झाली आहे. विवाहसोहळे आणि सणासुदीच्या मागणीमुळे भारताने 14.8 अब्ज डॉलर्सचे सोने आयात केले. याशिवाय खाद्यतेल, खते आणि चांदीच्या आयातीतही मोठी वाढ झाल्यामुळे व्यापार तुटीवर परिणाम झाला आहे. परिणामी, रुपयावरही मोठा ताण निर्माण झाला असून त्याला घसरण सहन करावी लागत आहे.
डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या निवडणुकीतील विजयानंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. ट्रम्प यांच्या विजयामुळे डॉलर निर्देशांक मजबूत झाला असून सत्तेत आल्यानंतर डॉलर आणखी बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ट्रम्प सरकार अमेरिकेत येणाऱ्या परदेशी वस्तूंवर शुल्क लागू करू शकते, ज्यामुळे आयात केलेल्या वस्तूंची खरेदी महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत, व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने डॉलर आणखी मजबूत होऊ शकतो, परिणामी रुपयात अधिक घसरण दिसून येऊ शकते.रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने डॉलरची विक्री करत आहे, जेणेकरून रुपयाला आधार मिळू शकेल. 27 सप्टेंबर 2024 रोजी RBI च्या परकीय चलन साठ्यात सुमारे 50 अब्ज डॉलरची घट नोंदवली गेली आहे.