रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा; मुख्यमंत्री निधी कक्षाची प्रभावी अंमलबजावणी…
पुणे, दि. २१ जुलै २०२५ :
आरोग्यदायी महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत पुणे जिल्ह्यातील १,७८५ रुग्णांना केवळ सहा महिन्यांत १७ कोटी २८ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. या निधीच्या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, डायलिसीस, अपघात, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या दुर्धर आजारांवरील उपचारासाठी गरजू रुग्णांना दिलासा मिळतो आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून कार्यरत असलेला हा कक्ष गरजू रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी सज्ज आहे.
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थापन अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या या निधीमध्ये समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी आर्थिक योगदान देऊन सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निधीमध्ये देणगी दिल्यानंतर त्यावर आयकर कलम ८०(जी) अंतर्गत सवलत मिळते.
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ कार्यरत असून गरजूंना अर्ज व मार्गदर्शनाची सुविधा येथे उपलब्ध आहे. cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा cmrfpune@gmail.com या ई-मेलवर ऑनलाईन अर्ज करता येतो, तसेच प्रत्यक्ष कार्यालयात ऑफलाइन अर्जाचीही सुविधा उपलब्ध आहे.
सदर मदत मिळवण्यासाठी अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, रुग्णालयाचे अंदाजपत्रक, आधार, रेशनकार्ड, उपचार व निदान अहवाल तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ४४५ रुग्णालये या योजनेशी संलग्न असून अधिक माहितीसाठी कक्ष प्रमुखांच्या ८०८७६७८९७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.