वेव्हज 2025’ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

‘वेव्हज २०२५’ मधून भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवे पंख…

मुंबई, २९ एप्रिल: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी ‘वेव्हज 2025’ ही आंतरराष्ट्रीय परिषद 1 मे रोजी मुंबईत भव्य स्वरूपात सुरू होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे.

1 ते 4 मे दरम्यान पार पडणाऱ्या या समिटमध्ये 100 हून अधिक देशांतील प्रतिनिधी, 120 आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बॉलिवूड, टॉलीवूड, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचाही सहभाग राहणार आहे.

मुंबई हे देशातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचे केंद्र आहे. बॉलीवूड, टीव्ही, ओटीटी आणि गेमिंग क्षेत्रातील नेतृत्व मुंबईकडे असून, ‘वेव्हज 2025’ या माध्यमातून भारताला ‘कंटेंट सुपरपॉवर’ बनवण्याचे उद्दिष्ट आहे. ऑस्कर, कान्स आणि दावोसच्या धर्तीवर भारतात प्रथमच अशा प्रकारची परिषद होत असून, याचे वार्षिक आयोजन करण्याचा मानसही केंद्र व राज्य सरकारने जाहीर केला आहे.

या चार दिवसीय परिषदेच्या काळात भारत, महाराष्ट्र, तेलंगणा यांसारख्या राज्यांचे स्वतंत्र पॅव्हेलियन उभारले जात असून विविध परिसंवाद, राउंड टेबल चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच भारताच्या सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण होणार आहे. ३ मे रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

‘वेव्हज बाजार’, ‘वेव्हेक्स 2025’ आणि ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ हे परिषदेतील मुख्य आकर्षण ठरणार आहेत. या व्यासपीठांद्वारे नवोदित निर्माते, स्टार्टअप्स, आणि डिजिटल कंटेंट निर्मात्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे. AI, व्हर्च्युअल प्रोडक्शन आणि इंटरॅक्टिव कंटेंट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित चर्चासत्रांमुळे ही परिषद धोरणात्मकदृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

FICCI-EY च्या अंदाजानुसार, 2024 मध्ये $28 अब्ज पर्यंत वाढलेला भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र 2025 मध्ये $34 अब्जच्या टप्प्यावर पोहोचेल. या पार्श्वभूमीवर ‘वेव्हज 2025’ ही परिषद भारताला जागतिक सर्जनशील महासत्ता बनवण्यासाठी एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!