शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर महाडीबीटी प्रक्रियेत बदल; कृषी आयुक्तांचे निर्देश

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज छाननी प्रक्रियेत बदल – शेतकऱ्यांना ७/१२, ८अ व आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही; कृषी योजनांचा लाभ घेणे झाले सोपे…

पुणे, दि.११ जुलै: कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना शेतकऱ्यांना आता ७/१२ उतारा, ८अ व आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही, अशी स्पष्ट सूचना कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. अर्ज छाननी प्रक्रियेत अनेक अर्ज केवळ ही कागदपत्रे न जोडल्यामुळे ‘Send Back’ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सन २०२५-२६ पासून महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी ‘Agris­tack’ आधारित Farmer ID च्या माध्यमातून केली जात आहे. या प्रणालीमुळे अर्जदार शेतकऱ्याची संपूर्ण माहिती – जसे की नाव, जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर, क्षेत्रफळ इत्यादी – पोर्टलवर आपोआप उपलब्ध होते. त्यामुळे ही माहिती पुन्हा दस्तऐवज स्वरूपात अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

कृषी विभागाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, Farmer ID द्वारे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित छाननी करावी व केवळ कागदपत्रे अपलोड न केल्याच्या कारणास्तव अर्ज ‘Send Back’ करू नये. या निर्णयामुळे अर्ज मंजुरी प्रक्रिया अधिक गतीमान होणार असून, योजनांचे लाभ तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

हा निर्णय विभागीय कार्यालयांमार्फत तत्काळ अंमलात आणण्यात येणार असल्याचे कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनीही याची नोंद घेऊन महाडीबीटी पोर्टलवर योग्य माहिती भरून अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!