७३० व्या समाधी वर्षानिमित्त अरण येथे पारंपरिक श्रीफळहंडीचा नयनरम्य सोहळा!
सोलापूर, दि. २४ (प्रतिनिधी):
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून पारंपरिक ‘श्रीफळहंडी’ उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते हंडी फोडण्यात आली.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत, टाळ मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्याने अरण नगरी भक्तिरसात न्हालेली दिसली. सुमारे पाच हजार श्रीफळांनी सजवलेली ही हंडी अरण येथील गिड्डे परिवाराच्या घरून पारंपरिक पद्धतीने समारंभपूर्वक आणली गेली आणि नियोजित पारावर बांधून फोडण्यात आली.
या सोहळ्याला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिजीत पाटील, माजी सभापती भारत शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे, रमेश बारसकर, सावता परिषदेचे कल्याणराव आखाडे, मृदुल माळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
दुपारी १२ वाजता संत सावता माळी महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी पालखीची भेट समाधी मंदिरासमोर झाली. पुष्पवृष्टी, महाआरती, अश्वपूजन, रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी यामुळे वातावरण भारावून गेले.
या वेळी देहूकर मंडळींचे कीर्तन आणि अरण परिसरातील भजनी मंडळांचे भजन यांमुळे भक्तिभावात भर पडली.
पंढरपूरकडे जाणाऱ्या वैष्णव दिंड्यांचे अरण येथे आगमन झाले असून, सावता महाराजांच्या समाधीला प्रत्यक्ष परमेश्वराच्या भेटीचे साक्षीदार होण्याचा भक्तांचा दृढ विश्वास या ठिकाणी जाणवतो.
भाविकांनी वाहिलेल्या नारळांपासून श्रीफळहंडी तयार केली जाते आणि हंडीतील नारळांचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतो. त्यामुळे श्रीफळहंडीचा प्रसाद मिळवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
संत सावता माळी महाराजांनी पेरलेल्या भक्तीच्या मळ्यात आज हजारो भक्तांनी श्रद्धेची फळे फुलवून अरण नगरी भक्तिरसात न्हालेली दिसली.