उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांनी अमृत संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा – जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल पाटील

सातारा दि. 4 : उद्योग क्षेत्राची कमी माहिती आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकजण उद्योजकतेकडे वळण्यात मागे पडतात. त्यामुळे युवक, युवतींमध्ये उद्योजकतेचे प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेऊन अमृत संस्थेने हे महत्वकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्यात अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना, अमृत-आयात निर्यात प्रशिक्षण योजना आणि अमृत- बेकरी प्रशिक्षण या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.
अमृत संस्थेच्या सोलर पी.व्ही. इंस्टॉलेशन, आयात-निर्यात आणि अमृत-बेकरी प्रशिक्षण योजना या तिन्ही निवासी प्रशिक्षण योजनांचा कालावधी १८ दिवसांचा आहे. यात ८०% तांत्रिक प्रशिक्षण व २०% उद्योजकता विकास यावर भर देण्यात येणार आहे. आयात-निर्यात प्रशिक्षण यामध्ये आयात-निर्यात प्रक्रिया, परकीय व्यापार धोरण याबद्दल मार्गदर्शनही केले जाणार आहे. सूर्यमित्र प्रशिक्षण, अमृत-बेकरी प्रशिक्षण योजनेत फक्त तांत्रिक ज्ञानच मिळणार नसून उद्योग उभारणीसाठी मदत केली जाणार आहे. योजनांची वैशिष्ठ्ये म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रकल्प अहवाल, कर्ज प्रस्ताव, उद्योग नोंदणी, कच्चा माल खरेदी याबाबत अमृत संस्था मार्गदर्शन करणार आहे. युवक, युवती www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!