इंद्रायणी दुर्घटनेने उभा केला खळबळजनक प्रश्न; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी?
पुणे (कुंडमळा ता. मावळ), दि. १५ जून – तळेगावनजीक इंदोरी गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीवरचा जुना लोखंडी पूल आज दुपारी अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर ५१ जण जखमी झाले असून, यामध्ये ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे २० ते २५ जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून अद्याप काहीजण बेपत्ता आहेत. पुलावर अपघाताच्या वेळी अंदाजे १२५ पेक्षाही जास्त नागरिक व पर्यटक उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
दुर्घटना घडताच स्थानिक ग्रामस्थ, तहसील प्रशासन, पोलिस, आणि एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. ३८ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, काहीजण अजूनही अडकलेले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक युद्धपातळीवर शोधमोहिम राबवत आहेत.
प्रशासनाने पूल धोकादायक असल्याचे फलक लावले होते, तरीदेखील नागरिक पुलावर गेले, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र, या गोष्टीतून प्रशासन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ धोक्याचा फलक लावणे ही उपाययोजना अपुरी होती. नागरिकांची ये-जा सुरळीत आणि सुरक्षितपणे होण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे होते. तसेच, हलकासा पाऊस किंवा प्रवाह वाढल्यास धोका होऊ शकतो, याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने पूल पूर्णतः बंद करण्याची तातडीची आणि ठोस कार्यवाही करणे अपेक्षित होते. कमीतकमी पुलाजवळ सुरक्षा रक्षक तैनात करून नागरिकांना तेथे प्रवेश न करण्याचे आदेश देणे आवश्यक होते, मात्र प्रत्यक्षात, प्रशासनाने फलक लावण्याव्यतिरिक्त कोणतीही ठोस खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येते. ना सुरक्षा रक्षक, ना अडथळे, ना पर्यायी नागरिकांना येजा करण्याची व्यवस्था या सर्व गोष्टीतून झालेला निष्काळजीपणा दुर्घटने मागे आहे का? हा प्रश्न निर्माण होतो.
या दुर्घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जखमींवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे आदेश दिले असून, या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
पूल जीर्ण स्थितीत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट वेळेवर झाले होते का? देखभाल दुरुस्ती कोणाच्या अखत्यारीत होती? आणि बांधकामाची जबाबदारी कोणावर होती? या बाबींची चौकशी होणार असली तरी प्रश्न असा पडतो दोन गावांना जोडणारा हा साकव पूल असल्यामुळे ह्या पुलाची जबाबदारी पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे का? अथवा जिल्हा परिषदेकडून देखभाल दुरुस्ती करिता पुल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला होता का? पुलाची जबाबदारी कोणावरही असली तरी स्थानिक नागरिकांनी या पुलाच्या खराब अवस्थेबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, तदनंतर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) या कार्यालयाकडून जुलै २०२४ मध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाल्यानंतर, ऑक्टोबरमध्ये ई-निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती. मग नवे सरकार स्थापन होऊनही तब्बल सहा महिने कार्यारंभ आदेश का लांबणीवर टाकण्यात आले? इतक्या मोठ्या प्रलंबित कालावधीत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था का उभी केली नाही? कार्यारंभ आदेश वेळेत न दिल्यामुळेच नवीन पूल उभारणीस विलंब झाला आणि पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळेच हा जीवघेणा अपघात घडला, असं म्हणणं चुकीचं ठरेल का? केवळ अपघातानंतरच पाच दिवसांपूर्वी आदेश दिल्याचं सांगून प्रशासन जबाबदारी झटकू पाहत आहे का? या साऱ्या घटनांमागे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, नियोजनाचा अभाव आणि बेजबाबदार कारभार नाही का? सदर घटनेतून प्रशासनाच्या भूमिकेवर हे प्रश्न उपस्थित होतात.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत, शासकीय मदतीची ग्वाही दिली असली तरीही “हा अपघात फक्त निसर्गाचा नव्हे, तर व्यवस्थेच्या हलगर्जीपणाची शोकांतिक बनला असून जीर्ण पुलाने अखेर जीव घेतले!” अशा बहुतांशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या असून देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दोशींवर कठोर कारवाई करणे, हीच या दुर्दैवी घटनेतील मृतांप्रती खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल का?
शेवटी नागरिकांचा जीव सत्तापीपासू राजकारणी, नफेखोर ठेकेदार आणि भ्रष्टाचारी प्रशासन अशा बर्मुडा ट्रँगल मध्ये फसला तर नाही ना? ही फक्त शंका नाही, तर व्यवस्थेच्या नालायकतेवर असलेला एक करुण, परंतु प्रखर सवाल आहे.