ड्रोन-एआयच्या सहकार्याने यंदाची वारी अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध…
पंढरपूर, दि. ८ जुलै:
आषाढी वारी २०२५ मध्ये पंढरपूरात झालेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर, यंदा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत एक नवा आदर्श उभा केला. सुमारे २७ ते २८ लाख वारकऱ्यांच्या हालचालीवर ड्रोनच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवण्यात आली.
ड्रोन चे नियोजन व संचालन…
वारी मार्गावरील गर्दीच्या नियंत्रणासाठी एकूण १५ ड्रोन तैनात करण्यात आले. यामध्ये ६ एआय सक्षम ड्रोन विश्लेषण व सूचना प्रसारणासाठी वापरण्यात आले, तर ९ मिनी ड्रोन जलद प्रतिसादासाठी उपयोगात आणले गेले. हे ड्रोन पंढरपूर पालखी मार्ग, श्री विठ्ठल मंदिर परिसर, रिंगण सोहळ्यांचे ठिकाण, तसेच मुक्काम स्थळांवर सकाळी ४ वाजल्यापासून दिवसभर कार्यरत होते.
गर्दीचा थेट आढावा आणि उपाययोजना…
या ड्रोनच्या फुटेजचा वापर करून AI प्रणालीने गर्दीचे थेट विश्लेषण केले. ही माहिती इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) ला पाठवली गेली. वरिष्ठ अधिकारी Blue Fire Live App च्या साहाय्याने मोबाईलवरूनच परिस्थितीवर लक्ष ठेवू शकले. उष्णता नकाशे (heat-maps), वाहतूक आणि गर्दीचे इशारे देण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी PA सिस्टीमद्वारे गर्दीला सूचना देण्यात आल्या.
अनधिकृत ड्रोनवर नियंत्रण…
सुरक्षा वाढवण्यासाठी दोन अँटी-ड्रोन उपकरणांचा वापर करण्यात आला. याच्या मदतीने एकूण ३२ अनधिकृत ड्रोनना अडवण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले.
तांत्रिक क्षमतांचा प्रभावी वापर…
ड्रोन तासभर उड्डाण करू शकतात आणि १० किमीपर्यंत परिसरावर नजर ठेवतात. यांना नाईट व्हिजनचीही जोड देण्यात आली होती, त्यामुळे रात्रीच्या वेळीही दक्षता राखता आली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून AI प्रणालीला विविध कोनांतून डेटा मिळाल्याने गर्दीच्या हालचालींचे अधिक चांगले विश्लेषण करता आले.
गर्दी नियंत्रणात, वारी यशस्वी
AI व ड्रोन यंत्रणेच्या समन्वयामुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आधुनिक पद्धतीने पार पडली. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दाखवलेले नियोजन आणि अंमलबजावणीचे कौशल्य भविष्यातील इतर मोठ्या धार्मिक वा सार्वजनिक कार्यक्रमांसाठीही दिशादर्शक ठरू शकते, सोबतच या तंत्रज्ञानाचा वापर केवळ सुरक्षा आणि नियंत्रणापुरता मर्यादित न ठेवता, भविष्यात वारकऱ्यांच्या सोयीसाठी व माहिती देण्यासाठीही विस्तारित करता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.