पुणे विमानतळावर ‘उमेद सावित्री’ विक्री दालनाचे उद्घाटन; राज्यातील महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक पाऊल

पुणे, दि. ३ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उमेद सावित्री’ या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे हे विमानतळावरील पहिलेच विक्री केंद्र ठरले असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, आमदार जगदीश मुळीक, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दालनातील वस्तूंची पाहणी करत महिला सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, विमानतळ संचालक संतोष डोके, पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांचीही उपस्थिती होती.

‘अवसर’ योजनेतून बचत गटांना मिळालेली नवी संधी

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि ग्रामीण महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढावे, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पुणे यांनी विशेष प्रयत्न करून २०२४ मध्ये पुणे विमानतळावर विक्री केंद्र उपलब्ध करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ‘अवसर’ योजनेतून ही संधी उपलब्ध झाली असून, स्थानिक स्वयंसहायता गटातील कुशल महिला कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आता विमानतळावर थेट विक्रीची संधी मिळाली आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांची उत्पादने देशी आणि विदेशी प्रवाशांपर्यंत पोहोचणार असून, त्यातून त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!