पुणे: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांनी केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावी आणि गावोगावी फिरणाऱ्या एजंटांकडून कोणतीही खरेदी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी बियाण्याच्या पॅकेटवर कंपनीचे नाव, लॉट नंबर, उत्पादन तारीख, अंतिम वापर तारीख, वाणाचे नाव, उगवण क्षमतेची टक्केवारी आणि लेबल तपासावे. बियाणे स्वच्छ, रोगमुक्त, एकसमान आकाराचे असावे आणि त्यात कचरा अथवा कीड नसावी. बीजप्रक्रिया झाली असल्यास त्यासाठी वापरलेले औषध तपासावे, अन्यथा योग्य औषध कोणते हे कृषीतज्ज्ञांकडून समजून घ्यावे.
बियाणे थंड व कोरड्या ठिकाणी साठवावे आणि खरेदीचे अधिकृत पक्के बिल घ्यावे. शेतकऱ्यांनी विकत घेतलेल्या बियाण्याच्या पिशव्या व बिल हंगाम संपेपर्यंत जपून ठेवाव्यात, जेणेकरून तक्रार करायची वेळ आल्यास ते पुरावा म्हणून वापरता येतील. पेरणीच्या वेळी बियाण्याची पिशवी शिलाई केलेल्या भागाने न फोडता खालील बाजूने फोडावी, जेणेकरून टॅग व लेबल सुरक्षित राहतील.
शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान व जमिनीच्या प्रकारानुसार योग्य जात निवडण्यासाठी कृषी तज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. योग्य व दर्जेदार बियाण्याची निवड केल्यास उत्पादनात वाढ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.