४ सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार!
पुणे, दि. १३ जून २०२५: राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये पुढील काही महिन्यांत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, या निवडणुकांपूर्वी महत्त्वाच्या टप्प्यापैकी असलेल्या प्रभाग रचना प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार, ११ जूनपासून सुरू झालेली प्रक्रिया ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
महापालिका प्रभाग रचनेचा टप्प्याटप्प्याने कालावधी खालीलप्रमाणे:
प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया ११ जून ते ७ जुलै २०२५
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर ८ जुलै ते १० जुलै २०२५
प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती/सूचना मागवणे २२ जुलै ते ३१ जुलै २०२५
प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे १ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२५
अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी (राज्य निवडणूक आयोगाद्वारे) २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पावले
प्रभाग रचना ही महानगरपालिका निवडणुकीतील महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया असून, लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रत्येक प्रभागात प्रतिनिधित्व निश्चित करण्यात येते. अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण, भौगोलिक सलगता, नैसर्गिक सीमा, आणि प्रशासकीय सुसंगती या निकषांवर आधारित ही रचना केली जाते.
प्रारूप प्रसिद्धीनंतर नागरिकांना हरकती व सूचना मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून सुनावण्या घेतल्या जातात. राज्य निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेऊन प्रभाग रचना जाहीर करतो, आणि त्यानंतरच निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याचा मार्ग मोकळा होतो.
राजकीय हालचालींना वेग, या प्रक्रियेच्या सुरुवातीनेच राजकीय पक्षांनीही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेनंतर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच स्थानिक पातळीवरील उमेदवार निवड, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, प्रचार यंत्रणा उभी करणे आदी हालचाली वेग घेण्याची शक्यता आहे.