माणूस तसा चांगला…पण वादग्रस्त बोलणं आणि ‘रम्मी’नं घात केला!
मुंबई: राज्य मंत्रिमंडळात मोठा खातेबदल करण्यात आला असून, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. तर याआधी क्रीडा मंत्रीपद भूषवणारे दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची जबाबदारी दिली गेली आहे.
हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणिउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे हे मोबाइलवर ‘रम्मी’ गेम खेळताना आढळले होते. त्याचा व्हिडिओ विरोधकांनी सोशल मीडियावर शेअर करत सरकारवर जोरदार टीका केली होती.
केवळ गेम खेळणं नव्हे, तर याआधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोकाटेंनी केलेल्या विवादग्रस्त विधानांमुळे ते सतत चर्चेत होते. ‘सरकार भिकारी आहे’ असे विधान, सभागृहात गंभीरपणे न वागणं यामुळे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून कृषी विभाग हटवून तुलनात्मकदृष्ट्या कमी महत्त्वाचं मानलं जाणारं क्रीडा व युवक कल्याण खाते देण्यात आलं आहे. त्यामुळे हा बदल ‘डिमोशन’ म्हणून पाहिला जात आहे.
दत्तात्रय भरणे हे मुळातच ग्रामीण भागाशी जोडलेले नेते असून, कृषी खात्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नवी दिशा देऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.