अधिकाऱ्यांचा डायट डब्बा; बंद चेंबर, उघडी व्यवस्था! शासकीय कार्यालयातील भयान वास्तव!
सत्यउपासक विशेष अग्रलेख ( भाग १ )
एका खास चेंबरमध्ये दररोज दोन ते तीन तास चालणारा “लंच” सत्र, ज्यामध्ये केवळ भोजन नाही, तर निर्णय, व्यवहार आणि सत्ता-संवादाची मेजवानी असते, सत्यउपासकच्या विशेष नजरेत हे गुपित आता फारसं गुपित राहिलेलं नाही, एका आजी आणि माजी अधिकारी यांच्यातील विशेष ऋणानुबंध आता देशाच्या भिंती पार करत परदेशात पोहोचले असल्याच्या चर्चा असून विशेष म्हणजे, विदेशात कंपन्याही आहेत!
शासन असो वा प्रशासन, कोणत्याही व्यवस्थेचा गाभा हा कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर आधारलेला असतो, असा आपला समज. परंतु, प्रत्यक्ष वास्तवाकडे डोळसपणे पाहिलं, तर लक्षात येतं की कामाच्या वेळेपेक्षा गप्पा मारण्याची वेळ आणि जनतेच्या प्रश्नांपेक्षा विशिष्ट लोकांसोबतच्या बैठका या अधिक महत्त्वाच्या ठरतात.
दुपारच्या ‘लंच च्या’ नावाखाली चालणाऱ्या या सत्रांमध्ये जेवणापेक्षा व्यवहार, आणि हितसंबंधांचे नवे धागेदोरे अधिक पक्के केले जातात. नियम, अधिकार, पदे, जबाबदाऱ्या या केवळ सरकारी फायलींमध्ये उरतात, तर प्रत्यक्ष निर्णय हे बंद दारांच्या आत ‘आपलेसे’ वाटणाऱ्यांसाठी घेतले जातात. सामान्य नागरिक, तक्रारदार, कर्मचारी यांच्या वाट्याला येतो तो केवळ प्रतीक्षालयातील निरोप “साहेब मिटिंगमध्ये आहेत!”
काही चेहरे इतके ‘स्वच्छ’ आणि ‘प्रभावी’ असल्याचे आव आणतात की त्यांच्याविरोधात तक्रार करायला कोणीही धजावत नाही. आणि जर कोणी नशिबाला दोष देत तोंड उघडलं, तर त्यांच्या भोवती शासकीय चौकशीचे जाळे इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने विणले जाते की तो आवाज कायमचा गुदमरून जातो. ही पद्धत गैरप्रकार रोखण्यासाठी नसून विरोध संपवण्यासाठी वापरली जाते, हे सर्वश्रुत आहे.
आर्थिक निर्णय, बांधकाम परवानग्या, बिलांची मंजुरी, अतिक्रमण कारवाया… या साऱ्याच गोष्टी एका विशिष्ट ‘सिस्टम’च्या साच्यात बसवून वापरल्या जातात. इथे ‘कायदेशीर’ किंवा ‘बेकायदेशीर’ यापेक्षा सुविधाजनक आणि असुविधाजनक हेच निकष ठरवले जातात आणि त्यात अडथळा आणणारा कोणताही आवाज, तो मग राजकीय असो वा व्यावसायिक अथवा सामान्य नागरिक याला या व्यवस्थेच्या सूक्ष्म पण प्रभावी तंत्राने ‘शांत’ केला जातो.
ही केवळ एका संस्थेची नव्हे, तर व्यवस्थेच्या सर्व स्तरांवर पसरत चाललेली ‘गप्पाशाही’ आहे. इथे निर्णय हे गप्पांच्या भोवती फिरतात आणि गप्पा म्हणजे नवा ‘वर्क कल्चर’. चहा, कॉफी, जेवण या केवळ निमित्तं असतात, खऱ्या गोष्टी तर बंद दरवाजां आड शिजवलेल्या असतात.
आपण म्हणतो, व्यवस्था बदलली पाहिजे. पण ती बदलण्यासाठी आधी या ‘गप्पा-यंत्रणेचा’ चेहरा उघड करण्याची गरज आहे.
कारण जेव्हा ‘गप्पा’ हे शासनाचे मुख्य साधन बनते, तेव्हा जनतेच्या प्रश्नांची ताटातूट होते, आणि त्यात टिकते ती केवळ भासमय स्वच्छतेची प्रतिमा, ती प्रतिमा मोडून काढण्याचे धाडस करणार कोण? की सारेच ‘ताटात’ सहभागी आहेत?