शनिशिंगणापूर; दरवाजाविना गावात देवस्थान लुटले!

दरवाजाविना गावात देवस्थान लुटले; शनि शिंगणापूरच्या घोटाळेबाजांवर फडणवीस सरकारची फौजदारी कारवाईची घोषणा…

मुंबई, दि.११ जुलै: अहमदनगर जिल्ह्यातील श्रद्धेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये मोठ्या आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार उघडकीस आले असून, या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिली.

विधानसभा सदस्य विठ्ठल लंघे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये बनावट ॲप्स, पावत्यांच्या माध्यमातून देणग्या वसूल करण्यात आल्या, तसेच हजारोंच्या संख्येने बोगस कर्मचाऱ्यांची नोंद करून पगाराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला.

चौकशी अहवालानुसार, संस्थानच्या विविध विभागांत तब्बल २४४७ बोगस कर्मचारी दाखवण्यात आले असून, त्यांच्या नावाने वेगवेगळ्या खात्यांमध्ये पगार जमा झाला. उदाहरणार्थ, रुग्णालय विभागात प्रत्यक्षात फक्त १३ कर्मचारी असताना ३२७ कर्मचाऱ्यांचे नोंदवले गेले. अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखभालीसाठी ८० कर्मचारी, १०९ खोल्यांच्या भक्तनिवासासाठी २०० कर्मचारी, १३ वाहनांसाठी १७६ कर्मचारी, तसेच प्रसादालय, गोशाळा, शेती, वृक्षसंवर्धन, सुरक्षा व इतर विभागांमध्येही अशीच बनावट कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचे उघड झाले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले की, या प्रकरणाची बाह्य तपास यंत्रणेमार्फत चौकशी केली जाईल आणि सायबर पोलिसांकडून बनावट ॲपच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक घोटाळ्याचा स्वतंत्र तपास सुरू आहे.

“जे ट्रस्टी लोकसेवकांच्या व्याख्येत येतात, त्यांच्या संपत्तीचीही चौकशी केली जाईल,” असेही त्यांनी नमूद केले.

शनि शिंगणापूर हे गाव ‘दरवाजाविना’ घरे असलेल्या श्रद्धेचे स्थान मानले जाते. या ठिकाणी आजवर चोरीही झाली नसल्याचे सांगितले जाते. अशा गावातच देवस्थानाच्या नावाखाली इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस येणे हे धक्कादायक आहे. त्यामुळे या ‘भक्तांच्या श्रद्धेचा’ गैरफायदा घेतलेल्या घोटाळेबाजांवर आणि त्यांच्या वरदहस्तांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!