
खरीपपूर्व ‘भारत कृषी-जागरण यात्रा’ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू…
पुणे, दि.२६: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘भारत कृषी-जागरण यात्रा’ हे विशेष अभियान देशभरात २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत राबवण्यात येत आहे. राज्यातही या यात्रेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, विविध तालुक्यांतील गावागावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या यात्रेचा उद्देश शेतकऱ्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे, कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे असा आहे. या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, जलसंवर्धन उपाययोजना, जैविक शेतीचे फायदे, माती परीक्षण व सुधारणा यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासोबतच, तज्ज्ञांच्या उपस्थितीत सल्ला शिबिरे, चर्चासत्रे व संवाद सत्रांचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत.
कृषी उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योगातील संधी निर्माण करणे, तसेच स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतमाल विक्रीसाठी मदत करणे या यात्रेच्या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहे. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती देऊन त्यांना त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. पाणी बचत तंत्रज्ञानाचा प्रचार, मृदासंवर्धनाचे उपाय सुचवणे आणि पर्यावरणपूरक शेतीचा प्रसार करण्यावरही भर दिला जात आहे.
राज्यातील कृषी विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त पुढाकाराने ही यात्रा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्यात येत असून, “खरीप हंगामापूर्वी शाश्वत शेती आणि तंत्रज्ञान साक्षरतेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
स्थानिक नियोजित कार्यक्रम तपासण्यासाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत पोर्टलवर कार्यक्रमाचे वेळापत्रक पाहावे.