पुणे महापालिका निवडणूक; तुरळक घटना वगळता मतदान शांततेत, आज १५ ठिकाणी मतमोजणी!
पुणे, दि.१६: राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी शहरातील ४०११ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण मतदान अतिशय शांततामय वातावरणात पार पडले, अशी माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या निवडणुकीची मतमोजणी गुरुवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होणार असून, पुणे महानगरपालिकेच्या १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रानुसार निश्चित करण्यात आलेल्या १५ ठिकाणी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
येरवडा–कळस–धानोरी विभागाची मतमोजणी कै. राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी येथे होणार आहे. नगर रोड–वडगाव शेरी विभागाची मतमोजणी नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीत केली जाणार आहे. शिवाजीनगर–घोले रोड विभागासाठी कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. औंध–बाणेर विभागाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे–बालेवाडी येथे होणार आहे.
कोथरूड–बावधन विभागाची मतमोजणी एमआयटी डब्ल्यू.पी.यु. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, द्रोणाचार्य बिल्डिंग (पहिला मजला), कोथरूड येथे होईल. कै. बा. स. ढोले पाटील रोड विभागाची मतमोजणी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क येथे करण्यात येणार आहे. हडपसर–मुंडवा विभागासाठी रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कर्मवीर सभागृह, हडपसर येथे मतमोजणी होणार आहे.
वानवडी–रामटेकडी विभागाची मतमोजणी जिजाऊ मंगल कार्यालय, एसआरपीएफ कॅम्प युनिट क्रमांक १, वानवडी येथे, तर बिबवेवाडी विभागाची मतमोजणी कै. बाबुराव सणस क्रीडांगणाजवळील कबड्डी मैदान, सारसबागे शेजारी, स्वारगेट येथे केली जाणार आहे. भवानी पेठ विभागासाठी रफी अहमद किडवाई उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळमजला हॉल (पुणे मनपा), भवानी पेठ येथे मतमोजणी होईल.
कसबा–विश्रामबागवाडा विभागाची मतमोजणी डी.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे, तर वारजे–कर्वेनगर विभागाची मतमोजणी पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग्रजी माध्यम शाळा, पौड फाटा येथे निश्चित करण्यात आली आहे. सिंहगड रोड विभागासाठी श्री शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, वडगाव बुद्रुक येथे मतमोजणी होणार आहे.
धनकवडी–सहकारनगर विभागाची मतमोजणी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रांगणातील बंदिस्त पत्रा शेडमध्ये, कै. राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर, पीएमपीएमएल डेपो लगत केली जाणार आहे. कोंढवा–येवलेवाडी विभागाची मतमोजणी छत्रपती संभाजी महाराज ई-लर्निंग स्कूल, कात्रज–कोंढवा रोड येथे पार पडणार आहे.
दरम्यान, या सर्व १५ मतमोजणी केंद्रांवर आवश्यक ती प्रशासकीय, सुरक्षा आणि तांत्रिक तयारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून पूर्ण करण्यात आली असून, मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.