AI for Agri 2026

AI for Agri 2026 जागतिक परिषद २२ फेब्रुवारीला…

मुंबई : कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी आणि जबाबदार वापर कसा करायचा, याची दिशा स्पष्ट करणारी AI for Agri 2026 जागतिक परिषद २२ व २३ फेब्रुवारी रोजी बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करताना जबाबदार, पारदर्शक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवण्यावर भर दिला जाणार असून तंत्रज्ञान केवळ प्रयोगापुरते न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्याचा स्पष्ट उद्देश मांडला जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित धोरणाची पुढील दिशा या परिषदेत स्पष्ट केली जाणार असून डेटा-आधारित शेती, डिजिटल सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना कसा थेट लाभ होऊ शकतो, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. शेतीतील निर्णय अधिक अचूक व्हावेत, पीक नुकसान कमी व्हावे, उत्पादनक्षमता वाढावी आणि हवामान बदलांच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देता यावे, या दृष्टीने विविध तांत्रिक उपाययोजना मांडल्या जाणार आहेत.

परिषदेत नव्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या नवउद्योजक आणि कृषी स्टार्टअप्सना विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांना स्वतंत्र स्टॉल्सद्वारे आपल्या उत्पादनांचे आणि तांत्रिक उपाययोजनांचे प्रत्यक्ष प्रदर्शन सादर करता येणार असून देश-विदेशातील कंपन्यांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि विविध प्रदेशांतून आलेले गुंतवणूकदार यांच्याशी समोरासमोर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून तंत्रज्ञानाची उपयुक्तता, व्यवहार्यता आणि विस्तारक्षमता यावर थेट चर्चा होऊन पुढील भांडवल उभारणीसाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यांत्रिकी आधुनिकतेचा वापर वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी आयुक्त सूरज मांढरे, एआय अँड अ‍ॅग्रीटेक इनोव्हेशन सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत आंडगे आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग दाभाडे यांच्यासह नंदन निलेकणी, दीपक पारेख, देवेश चतुर्वेदी, डॉ. सौम्या स्वामिनाथन तसेच जागतिक बँक, एफएओ, आयसीआरआयएसएटी, आयआयटी बॉम्बे, गुगल डीपमाइंड आणि संयुक्त राष्ट्रसंस्थांशी संबंधित तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

या परिषदेतून कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित परिवर्तनाची व्यापक दिशा स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!