Ajit Pawar: Not reachable, yet always in our hearts.

अजित दादा आपल्यातून गेले; विकास हरवला!

दादा कायमचेच नॉट रीचेबल!

पूर्वी ‘दादा नॉट रिचेबल’ म्हणजे पुढच्या निर्णयाची चाहूल असायची पण आज मात्र हे नॉटरीचेबल होणे काळजाला चिरत आहे…

सत्यउपासक विशेष लेख:

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे केवळ पदांमुळे नव्हे, तर निर्णयक्षमतेमुळे ओळखली जातात.

अजित पवार हे त्या मोजक्या नेत्यांपैकी एक असून दादांची राजकीय कारकीर्द संघर्ष, बदल आणि निर्णायक वळणांनी भरलेली असून सत्तेत असो वा विरोधात, भूमिका स्पष्ट ठेवणं आणि जबाबदारी स्वीकारणं हे त्यांनी कधी सोडलं नाही. निर्णयांचे राजकीय परिणाम होतील याची जाणीव असूनही, अंमलबजावणीच्या दृष्टीने योग्य वाटणारा निर्णय घेण्याची तयारी त्यांनी नेहमीच दाखवली म्हणूनच त्यांच्या उपस्थितीने राजकारणात हालचाल निर्माण होत असे; आणि अनुपस्थितीनेही तितकीच अस्वस्थता निर्माण होई!

प्रशासनातील काटेकोरपणा, कामाची गती आणि परिणामाभिमुखता हे त्यांच्या कार्यशैलीचे स्थायी गुणधर्म तसेच सत्तेत असो वा विरोधात, भूमिका स्पष्ट ठेवून निर्णय घेण्याची त्यांची तयारी अनेकदा चर्चेचा विषय ठरली. जातिवाद, धार्मिक ध्रुवीकरण किंवा भावनिक मुद्द्यांच्या भोवऱ्यात न अडकता विकास हेच राजकारण अशी स्पष्ट भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. रस्ते, पाणी, सिंचन, उद्योग, सहकार, अर्थकारण या क्षेत्रांत त्यांनी वेळोवेळी कठोर पण ठाम भूमिका घेतल्या; भाषणांपेक्षा अंमलबजावणी, घोषणांपेक्षा वेळेत पूर्ण होणारी कामं, आणि लोकप्रियतेपेक्षा परिणामकारक निर्णय हीच त्यांच्या नेतृत्वाची ओळख होती.

प्रशासनावर असलेली त्यांची पकड केवळ अधिकारामुळे नव्हे, तर प्रशासनाचा सखोल अभ्यास आणि वेळेची अचूक जाण यामुळे होती. कोणती फाईल कधी, कुठे आणि कशी अडते याची त्यांना अचूक जाणीव असे. त्यामुळेच अनेक रखडलेले प्रकल्प गती घेत. वेळेचे भान, निर्णयाची अचूकता आणि कामाची शिस्त हे त्यांच्या कार्यपद्धतीचे स्थायी गुण होते.

जनसंपर्काच्या बाबतीतही त्यांनी वेगळी वाट निवडली. कार्यकर्त्यांना चुकीची आमिषे न दाखवता, अवास्तव आश्वासनं न देता, परिस्थिती जशी आहे तशी रोखठोक मांडणं ही त्यांची शैली होती. कठोर वाटली तरी प्रामाणिक भूमिका मांडणं, आणि चुकीच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना अडचणीत न टाकणं, हा त्यांच्या राजकारणातील महत्त्वाचा गुण होता. त्यामुळेच त्यांच्याशी सहमत नसलेलेही त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा आदर करत असतं!

पूर्वी दादा अचानक नॉट रिचेबल व्हायचे परंतु तेव्हा मात्र सगळ्यांना कळायचं, काहीतरी मोठं घडणार आहे. त्या वेळी दादा जाणूनबुजून जनतेतून, पत्रकारांपासून दूर, एकांतात राहायचे, त्यावेळची त्यांची अनुपस्थिती निर्णयांची तयारी आणि पुढील हालचालींची नांदी असायची परंतु या वेळेचा एकांत हा निवडलेला नसून दैवाने लादलेला आहे, पत्रकारांचे प्रश्न आहेत पण उत्तर नाही तर केवळ आठवणी आहेत. राजकारणातल्या त्या परिचित “नॉट रिचेबल” शब्दांना आज अंतिम शांततेचा अर्थ चिकटला आणि म्हणूनच ही वेळ वेगळी असून यावेळी महाराष्ट्रच जणू नॉट रिचेबल झाला आहे! तरीही आजही मन कुठेतरी सांगतं दोन-तीन दिवसांनी दादा समोर येतील आणि नेहमीसारखेच थेट, ठाम शब्दांत बोलतील; पण ही आशाच आता सर्वात जड वाटते… कारण ती पूर्ण होणार नाही, हेही मनाला माहीत आहे.

आज त्यांच्या अनुपस्थितीने निर्माण झालेली पोकळी केवळ एका पदाची नाही; ती विकासकेंद्री, प्रशासकीय समज असलेल्या आणि वेळेच्या कसोटीवर निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज जी निर्णायक शांतता जाणवते, ती दीर्घकाळ जाणवत राहील.

या क्षणी खरी श्रद्धांजली म्हणजे भावनिक घोषणांपुरती मर्यादित न राहता, जात-धर्मापलीकडे जाऊन विकास, प्रशासन आणि प्रामाणिक राजकारणाची वाट पुढे नेणे हीच त्यांच्या कार्याला दिलेली खरी आदरांजली ठरेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!