example of true service towards humanity

शेतकऱ्यांसाठी कृषी अधिकाऱ्यांचा संवेदनशील निर्णय!

एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस; मा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर!

पुणे, दि. २९: राज्यातील अतिवृष्टीमुळे कोट्यवधींची शेती पिकं जलमय झाली असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, पुणे यांनी सामाजिक जाणीवेने पुढाकार घेत एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.

या संदर्भात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची संजय काचोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना पुणे यांनी निवेदन सुपूर्त केले असून या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कृषी सेवा वर्ग १ संवर्गातील कार्यरत असणाऱ्या सुमारे ३५० अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला असून सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातून हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमा केला जाणार आहे.

सदर निवेदन सादर करताना संजय काचोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांच्यासमवेत विजयकुमार राऊत, अधीक्षक कृषी अधिकारी (विभागीय कृषी सहसंचालक, पुणे) यांच्यासमवेत अन्य अधिकारीही उपस्थित होते.

अतिवृष्टीच्या संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ पंचनामे करून थांबून न राहता थेट आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरं तर एक नवा आदर्श उभा केला आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या कठीण काळात “शेतकरी एकटा नाही, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत” हा संदेश देणारे हे पाऊल खरोखरच वाखाणण्याजोगे असून यावेळी कृषी विभागाकडून सर्वतोपरी कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले असून लवकरच पंचनामे पूर्ण होऊन मदत शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचेल अशी आशाही व्यक्त करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!