बजाज पुणे ग्रँड टूरच्या नावाखाली ४०० कोटींचा ‘विकासघाट’?; पुणे तिथे काय उणे!
आधी G-20 परिषदेचा घाट आणि आता बजाज ग्रँड टूर सायकल स्पर्धा हे सर्व उपक्रम विकासासाठी की विकासाच्या नावाने मलिदा आणि केवळ दिखाव्यासाठी?
सत्यउपासक विशेष : पुणे तिथे काय उणे हे वेळोवेळी प्रशासनाने सिद्ध केले असून आधी G-20 च्या नावाखाली विकासाची भव्य स्वप्ने रंगवली गेली आणि आता ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या नावाखाली पुन्हा तशीच स्वप्नांची पुनरावृत्ती सुरू असून कोट्यवधींचा खर्च, आंतरराष्ट्रीय दर्जाचे दावे आणि विकासाच्या घोषणा होत असताना या साऱ्या उपक्रमांतून प्रत्यक्षात साध्य काय झाले आणि भविष्यात पदरात काय पडणार? जी ट्वेंटी परिषदेच्या आयोजनानंतर सामान्य नागरिकांच्या जीवनमानात नेमका कोणता मूलभूत बदल घडला? म्हणूनच विकासाच्या नावाखाली उभारले जाणारे हे इव्हेंट्स खरोखर जनहितासाठी आहेत की केवळ दिखाव्यासाठी असेच म्हणावे लागेल!
जिल्ह्यात १९ ते २३ जानेवारी दरम्यान होत असलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने स्पर्धेचे आयोजन टप्पा एक व टप्पा दोन अशा दोन टप्प्यांत करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका तसेच मुळशी, मावळसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत.
स्पर्धेचा टप्पा-१ टीसीएस गेटसमोरून सुरू होऊन माण, अंबवडे गाव कमान, पौड, चाले, मांडगाव, कोळवण, हडशी लेक, जावण, तिकोना पेठ, काले, कडधे, थुगाव, शिवणे, डोणे, सावळे चौक, आढळे बुद्रुक, बेबडओहळ, चंदनवाडी, चांदखेड, कासारसाई-नेरे, मारुंजी, लक्ष्मी चौक, भूमकर चौक, डांगे चौक, श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डी. वाय. पाटील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे समाप्त होणार आहे.
तर टप्पा-२ पुणे महानगरपालिका हद्दीतील लेडीज क्लब, कॅम्प येथून सुरू होऊन गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरव्होळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, खेड शिवापूर, कोंढणपूर, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी, खडकवासला आणि नांदेड सिटी, सिंहगड रोड येथे संपणार आहे.
ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची व ऑलिम्पिक पात्रतेची असल्याचा दावा करत या मार्गांवर फुल विड्थ पेव्हर डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असून अवघ्या तीन महिन्यांत ३५० किलोमीटर रस्ते तयार करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो. यावर्षी सुमारे ५०० किलोमीटरची स्पर्धा होत असून, पुढील चार वर्षांत ही स्पर्धा १,५०० किलोमीटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही सांगितले जात आहे.
या स्पर्धेत पावणेदोनशेहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून मुळशी, मावळ, बारामती, भोर, राजगड, हवेली, पुरंदर व वेल्हा तालुक्यांमधून मार्ग जात असल्याने येथील शिवकालीन इतिहास, निसर्गसौंदर्य व पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर पोहोचतील, असा दावा केला जात आहे. मात्र ही नाण्याची एक बाजू असली तरी दुसरी बाजू अधिक गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
जिल्ह्यातील अनेक गडकिल्ले नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. अशा वेळी त्या गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन, पुरातन वसा टिकवण्यासाठी आवश्यक डागडुजी, व्यवस्थापन व संशोधनावर भर देणे अपेक्षित असताना रस्त्यांसाठी शेकडो कोटींचा निधी घाईघाईने खर्च करण्यात येतो आहे. हा खर्च खरोखर पर्यटनविकासासाठी आहे की ठेकेदारांना पोसण्यासाठी आणि येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो.
केवळ ७० दिवसांत आंतरराष्ट्रीय दर्जाची कामे पूर्ण झाली, असा दावा केला जात असताना जिल्ह्यातील इतर ठिकाणी तीन-तीन महिने कामे सुरू असूनही दर्जेदार रस्ते होत नसल्याचे वास्तव सर्वश्रुत आहे. मग येथे हे काम एवढ्या कमी कालावधीत कसे शक्य झाले? निविदा प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात राबवण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी या कामांचा सर्व खर्च जिल्हा नियोजन व विकास निधी (डीपीडीसी), पीएमआरडीए आणि अन्य बजेटमधून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या रस्त्यांचा पुढे नागरिकांना खरोखरच उपयोग होणार असेल तर ते स्वागतार्ह ठरेल, मात्र कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि उपयुक्तता याचा फैसला येणारा काळच ठरवणार असून पुण्यासारख्या शहरात जी-२० परिषदेसाठी या आधी सुद्धा याच पद्धतीने शेकडो कोटींची उधळपट्टी करण्यात आली आणि काही महिन्यांतच परिस्थिती ‘जैसे थे’ झाली, तो अनुभव अजून ताजा असतानाच पुन्हा एकदा तोच ‘विकासाचा घाट’ दाखवला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
हा सर्व निधी जनतेच्या करातून जमा झालेला पैसा आहे. या स्पर्धेतून नेमके किती आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होणार, स्थानिक तरुणांना किती कायमस्वरूपी रोजगार मिळणार, आणि जिल्ह्याच्या पर्यटन व अर्थव्यवस्थेला प्रत्यक्षात किती चालना मिळणार, हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. विकासाच्या नावाखाली रंगवले जाणारे हे आभासी चित्र पुढे जाऊन जनतेच्या पदरात काय टाकणार, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेवटी प्रश्न पडतात आधी G-20 च्या नावाखाली विकासाची स्वप्ने दाखवली गेली, आता ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या नावाखाली पुन्हा तशीच स्वप्नरंजनाची मालिका सुरू आहे; मात्र या साऱ्या स्वप्नांतून प्रत्यक्षात साध्य काय झाले? अथवा जागतिक दर्जाच्या इव्हेंट्सच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च होत असताना सामान्य नागरिकांच्या आयुष्यात नेमका कोणता बदल होणारं!