सत्यउपासक विशेष: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रचाराच्या माध्यमातून सामाजिक जाणीव, पर्यावरणपूरक वर्तन आणि जबाबदारीचा संदेश देणे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष आचरणातून मात्र त्याला छेद देणारेच प्रकार सातत्याने समोर येत असून आश्वासन आणि कृती यातील विरोधाभास प्रकर्षाने जाणवत आहे.
शहरातील वाढते वायू प्रदूषण, धूळ आणि ध्वनी प्रदूषण याबरोबरच ट्रॅफिक समस्या रोखण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देणारे अनेक उमेदवार प्रत्यक्ष प्रचारादरम्यान मात्र याच समस्यांमध्ये भर घालताना दिसत असून पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त शहर आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे आश्वासन देणारे हे उमेदवार प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर शेकडोंच्या बाईक रॅली काढत असून त्यामुळे ट्रॅफिक बरोबरच ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणातही लक्षणीय वाढ होत असून हा विरोधाभास नाही का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
एकीकडे उमेदवारांकडून शहरातील वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जाम आणि अपघातांवर उपाययोजना करण्याची भाषा केली जाते, मात्र दुसरीकडे शेकडो दुचाकींच्या रॅली काढून रस्त्यांवर आणखी गोंधळ निर्माण केल्यामुळे शाळकरी मुले, रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार यांना याचा फटका बसत असून अशा रॅलींमुळे मुख्य चौकांमध्ये वाहतूक विस्कळीत होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
निवडणूक प्रचार हा केवळ शक्तिप्रदर्शनाचा नव्हे, तर विचार आणि कृतीतून विश्वास निर्माण करण्याचा काळ असतो. मात्र सध्या दिल्या जाणाऱ्या आश्वासनांशी प्रत्यक्ष कृतीचा मेळ बसत नसल्याने उमेदवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यावरण, आरोग्य आणि वाहतूक याबाबत खरोखरच गंभीर असाल, तर प्रचारातही त्याचे प्रतिबिंब दिसायला हवे! मात्र या प्रचार रॅलींमध्ये कर्णकर्कश आवाज करण्यासाठी बदललेले सायलेन्सर, फटाक्यांच्या माळा, मोठ्या क्षमतेचे स्पीकर्स यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे आधीच प्रदूषणग्रस्त असलेल्या शहरातील हवेत अधिक धूर, ध्वनी प्रदूषण आणि गोंगाट निर्माण होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे पर्यावरण संवर्धन, धूळ नियंत्रण आणि स्वच्छ हवेच्या गप्पा रंगत असताना दुसरीकडे या बाईक रॅलींमुळे वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणातही लक्षणीय वाढ होत आहे. ट्रॅफिक जाम कमी करण्याचे आश्वासन देणारेच प्रचाराच्या नावाखाली रस्त्यांवर जाम निर्माण करत असल्याने उमेदवारांच्या भूमिकेतील विरोधाभास अधोरेखित होत आहे.
उमेदवारांनी पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त शहर आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचे संदेश केवळ प्रचारापुरते अथवा भाषणांपुरते न ठेवता ते आपल्या आचरणातून ठामपणे व्यक्त करायला हवेत, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीविरोधात जनजागृती करायची असेल, तर केवळ जाहीरनाम्यातून अडचणी न सोडवता प्रत्यक्ष आचरणातून त्या सोडवाव्यात जसे प्रभागातून बाईक रॅली काढण्याऐवजी पायी किंवा सायकल रॅली काढून स्वच्छ हवा, उत्तम आरोग्य आणि शाश्वत वाहतुकीचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांसमोर ठेवून कथनी आणि करणी यातील स्वतःची ठाम भूमिका स्पष्ट करत केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात याच्या पुढे जाऊन आचरणातून अडचणींवर मात करणारे हेच खरे नेतृत्व ठरेल, अशा वर्तणुकीतूनच उमेदवारांची पर्यावरणाबाबतची प्रामाणिक भूमिका, जबाबदारीची जाणीव आणि भविष्यासाठीचा दृष्टिकोन अधिक ठळकपणे दिसून येईल. केवळ बोलण्यातून नव्हे, तर आपल्या आचरणातून आणि वागण्यातून संदेश देणे हीच आजच्या काळातील खरी गरज आहे.
समाजात वाहतूक कोंडी कमी करणे, अपघातमुक्त शहर घडवणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्ती सोबतच प्रदूषणमुक्त शहराचा संदेश देण्यासाठी स्वतःच्या प्रभागात विशेष मोहिमा राबविल्या पाहिजेत, जसे थोड्या अंतरासाठी पायी चालणे याला प्राधान्य देत, शक्य असेल तर सायकलचा वापर जास्तीत जास्त व्हावा याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता आणणे, तसेच ई-वाहने आणि प्रदूषणमुक्त प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी उमेदवारांनी केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्षात आपल्या प्रभागात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविणे, ई-सायकल वापराला चालना देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत नवीन आणि व्यवहार्य योजना आखण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आता वेळ आली आहे ती नागरिकांनी जागरूक होऊन उमेदवारांच्या घोषणा आणि त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनातील फरक ओळखण्याची, करणी आणि कथनी यांचा ताळेबंद मांडण्याची, गोड बोलणे, जाहीरनामे, वचननामे आकर्षक असू शकतात; पण खरे नेतृत्व हे कृतीतूनच ओळखले जाते. येत्या निवडणुकीत मतदारांनी केवळ आश्वासनांवर नव्हे, तर उमेदवारांच्या आचरणावर विश्वास ठेवावा.
आपले मत हे केवळ एक हक्क नाही, तर शहराच्या भविष्यासाठीची जबाबदारी असून स्वच्छ हवा, सुरक्षित रस्ते, सुसंस्कृत राजकारण आणि आरोग्यदायी जीवनासाठी आता मताच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची वेळ आली असून आजचे मत उद्याच्या पिढीचा श्वास ठरवणार आहे, हे विसरून चालणार नाही, यासाठी जागरूकपणे, विचारपूर्वक आणि निर्भयपणे योग्य त्या उमेदवारालाच मत द्यावे!