PMC election Alliances from unity to uncertainty

आघाडी कोसळली, युती अडकली; पुण्यात राजकीय गोंधळाचे वातावरण!

पुण्यात राजकीय रणधुमाळी शिगेला; ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’सह आघाड्या-युतींचा गोंधळ, इच्छुकांची घालमेल

सत्यउपासक विशेष/पुणे, दि.२७:

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा अखेर फिस्कटल्याने त्याचे तीव्र पडसाद पुण्यातील सर्वच प्रभागांत उमटताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक दुहेरी आव्हान ठरणार असून, एकीकडे भाजपविरोधात लढताना दुसरीकडे ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ असा थेट सामना उभा राहण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. यामुळे पुण्यातील निवडणूक केवळ सत्तासंघर्षापुरती मर्यादित न राहता अंतर्गत राजकीय संघर्षाचे केंद्र बनली आहे.

दुसरीकडे पुण्यात महाविकास आघाडी होणार की नाही, याबाबत अजूनही प्रचंड साशंकता आहे. काँग्रेस स्वतंत्र लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसेसोबत आघाडीत जाणार, यावर अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. त्याचवेळी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीची बोलणीही रखडल्याचे समजत असून, त्यामुळे सत्ताधारी आघाडीतही अनिश्चिततेचे वातावरण आहे.

या सर्व राजकीय घडामोडींमुळे इच्छुक उमेदवार अक्षरशः संभ्रमात सापडले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबरपर्यंतच असल्याने, तिकीट कोणाला मिळणार, कोणता पक्ष कोणासोबत जाणार आणि बंडखोरीचे चित्र कसे असेल, याबाबत स्पष्टता नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरून पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने युती अथवा आघाडीबाबत ठोस निर्णय होत नसल्याने तळागाळातील कार्यकर्ते आणि उमेदवार अस्वस्थ झाले आहेत.

यातच पक्षांची एक वेगळीच रणनीती समोर येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या एक-दोन दिवस आधीच अधिकृत ‘एबी फॉर्म’ देऊन बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे. या डावपेचामुळे शेवटच्या क्षणापर्यंत चित्र धूसर ठेवून नाराज उमेदवारांना पर्याय उरू न देण्याची खेळी खेळली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परिणामी, कोणत्याच प्रभागात उमेदवारांची अंतिम यादी स्पष्ट झालेली नाही.

भाजपमध्येही दुसऱ्या पक्षातून आयात उमेदवारांची संख्या वाढत असल्याने पक्षातील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आयत्या वेळेस पक्षप्रवेश करून थेट तिकीट मिळेल का, याची साशंकता अनेक इच्छुकांच्या मनात असून, मेहनत करून संघटना वाढवणाऱ्यांना डावलले जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे भाजपमध्येही अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

एकंदरीत पुणे महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, राज्यातील सत्तासमीकरणे, पक्षांतर्गत संघर्ष, फुटीचे राजकारण आणि आघाड्या-युतींच्या अपयशाचे प्रतिबिंब ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट निर्णय होत नाही, तोपर्यंत पुण्यातील राजकारण असेच तापलेले राहणार असून अखेरच्या क्षणापर्यंत अनिश्चिततेचे सावट कायम राहण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!