व्यावसायिक अर्हता कागदपत्रे न सादर केल्याने २,२०७ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द!
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द!
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५
पुणे दि.१२ :- शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने २७ मे २०२५ ते ३० मे २०२५ व ०२ जून २०२५ ते ०५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्हयांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने ८ दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. या परीक्षेस एकूण २,२८,८०८ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण २,११,३०८ प्रविष्ठ झाले होते.
या परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. तद्नंतर बी.एड. परीक्षेचे व डी.एल.एड. परीक्षेचे Appear म्हणून ज्या विदयार्थी,उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्या विदयार्थी उमेदवारांना शासन शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, ०२ मे २०२५ अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते.
त्यानुसार या कार्यालयाचे प्रसिध्दी निवेदन ०९ सप्टेंबर २०२५ अन्वये ज्या विदयार्थी, उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उतीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास सादर करणेबाबत दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. तद्नंतरही ज्या विदयार्थी उमेदवारांनी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र या कार्यालयास सादर केले नाही अशा २५३७ विद्यार्थी , उमेदवारांना २० सप्टेंबर २०२५ रोजी SMS द्वारे उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र सादर करणेसाठी २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.
तरी २५३७ विद्यार्थी व उमेदवारां पैकी २२०७ विद्यार्थी, उमेदवारांनी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर न केल्याने निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या २२०७ विद्यार्थी उमेदवारांचा निकाल रद्द करण्यात येत आहे. या विद्यार्थी, उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. तथापि याबाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सद्यःस्थितीत केला जाणार नाही असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.