जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर
७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी
मुंबई, दि.३०: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यापूर्वी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने दि. २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत जाहीर केलेल्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, जिल्हाधिकारी यांच्याकडून निवडणूक कार्यक्रमाची सूचना दि. ३१ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान दि. ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून, मतमोजणी दि. ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे.
तसेच, निवडून आलेल्या सदस्यांची नावे दि. ११ फेब्रुवारी २०२६ (बुधवार) पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू असून निकाल जाहीर होईपर्यंत ती अंमलात राहणार असल्याचेही आयोगाने कळविले आहे. सुधारित कार्यक्रमामुळे संबंधित जिल्ह्यांतील राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रशासनाने निवडणूक तयारीला गती दिली आहे.