This Diwali, light a lamp for those who harvest your joy

दिवा जळू दे सारी रात… पण या वेळी तो दिवा शेतकऱ्यांच्या आयुष्यातला प्रकाश व्हावा!

या वर्षीच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः वाहून गेलेत, एकीकडे दिवाळीचा सण आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची अवस्था! यासाठी पुढील काव्य!!!

 🌼 ✨ दिवा जळू दे सारी रात ✨ 🌼

पिकांच्या विमा योजना कागदावर आहेत,
भरपाईच्या घोषणा राजकीय भाषणात आहेत,
पण शेतात मातीत वास्तवात मात्र फक्त चिखल आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातील ओलसर कडेच्या आड हिशेबाचा वेदनादायक आकडा आहे.

आज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या घरात दिवा लावायलाही तेल नाही…

मुलांच्या डोळ्यात फटाक्यांचा प्रकाश नाही, तर भविष्याची काळजी आहे.

पत्नीच्या हातात फराळ नाही, तर फाटलेला ओला पदर आहे.

आणि शेतकऱ्याच्या ओठांवर हास्य नाही, तर पावसाने ओथंबलेले नि:शब्द शब्द आहेत.

कष्टाळू आणि आशावादी शेतकरी दरवर्षी नव्या जोमाने शेतीत उतरतो,पण या वेळी आभाळानेच त्याच्यावर कोसळत सूड घेतलाय!

पिकं जमिनीत गाढली गेली, जनावरांचं खाद्य संपलं, गोठ्यात चिखल, आणि अंगणात अंधार‌ अशा स्थितीत ज्यांच्या घरी दिवाळीत आनंदाचा दिवा लावला जायचा,त्या घरात या वर्षी ‘दिवाळी’ नाही  ‘दिवाळं’ निघालं आहे!!!

अंधार कितीही गडद असो,

प्रकाश नेहमीच वाट शोधतो,

कणाकणाने तेल संपतं,

पण दिवा तरीही जळत राहतो…

दीपावली सांगते आपल्याला,

अंधारावर विजय म्हणजे फक्त दिवे नव्हेत,

तर मनातील काळोखावर मिळवलेला विजय यासाठी विश्वास, प्रेम आणि संयम हेच खरे तेजस्वी दिवे!

जगात प्रत्येक हृदयात एक दिवा आहे,

तो प्रेमाने लावा, आशेने जपावा,

जग अंधारले तरी काही हरकत नाही,

फक्त स्वतःतील उमेद जिद्द विझू देऊ नका…

अंधार म्हणजे शेवट नाही…

तो तर नव्या प्रकाशाचा जन्मकुंड आहे.

जे काही महान, जे काही शाश्वत आहे या अवनीवर ते सगळं अंधाराच्या कुशीतच जन्म घेतं.

बीजही जमिनीच्या काळोखात रुजतं,

वृक्ष बनून सावली देतं, जगाला प्राणवायू देतं, आणि स्वतः मात्र मातीमध्ये मिसळतं…

हेच तर ‘दान’ आहे, देत राहण्याचं, जळत राहण्याचं,

स्वतःचं अस्तित्व न गमावता, जगाला प्रकाश देण्याचं…!

माणूसही असाच…अंधारात जन्म घेतो आईच्या उदरात, नऊ महिने, नऊ दिवस, नऊ सेकंद…

मायेनं विणलेल्या त्या काळोख्या प्रेमात तयार होतो तो जीव, जो नंतर प्रकाशाच्या शोधात जगभर भटकतो…

प्रेम मिळालं, तर तो माणूस ‘दीप’ बनतो जगाला उजळवणारा आणि  अहंकार भरला, तर मात्र होतो  ‘धूर’ शेवटी राख होऊन स्वतःचं अस्तित्वच विझवणारा…!

आज शेतकरीही अशाच जळणाऱ्या दिव्यासारखा आहे 

स्वतः विझतो, पण दुसऱ्यांना जगवतो.

त्याच्या श्रमातूनच या देशाचं अन्न तयार होतं,

पण त्याच्यासाठी मात्र कुणाच्याही घरात दिवा पेटत नाही.

या दीपोत्सवात आपण शहरातल्या प्रकाशझोतात दिवे लावताना

थोडा विचार त्या अंधाऱ्या शेतकऱ्यांच्या घराचा करू या 

ज्याच्या हाताने आपण खातो, पण जो स्वतः रिकाम्या पोटी झोपतो.

त्याच्यासाठी एक दिवा लावू या संवेदनांचा, मदतीचा, आणि कृतज्ञतेचा.

या दिवाळीला दिवा उजळू दे सारी रात…
पण या वेळी तो दिवा शेतकऱ्यांच्या आयुष्यातला प्रकाश व्हावा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!