Transfers; The new shield for corruption.

सार्वजनिक आरोग्य विभागातील वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्या!

निष्क्रियता आणि गैरव्यवहार झाकले गेले बदल्यांच्या पडद्याआड!

मुंबई, दि.११: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १० सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व विशेषज्ञ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून या बदल्यांमध्ये काहींचा कार्यकाळ प्रचंड वादग्रस्त ठरल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांची सहाय्यक संचालक (शहरी) इतर संसर्गजन्य / असंसर्गजन्य आजार, मुंबई या पदावर बदली करण्यात आली असून याआधी २०१४-१५ मध्ये ते सहाय्यक संचालक (खरेदी) या पदावर मुंबईत कार्यरत असताना २९७ कोटींच्या औषध खरेदी घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले होते. त्यांच्या पुण्यातील कार्यकाळातही मानधनावर नेमलेल्या डॉक्टरांकडून लाखोंची वसुली, इंटर्नशिप नेमणुकीसाठी लाच, वैद्यकीय अधिकारी यांच्या सीआर रिपोर्ट करता सुद्धा दरपत्रक, तसेच रुग्णालय नोंदणी व नूतनीकरणातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींनी त्यांची कारकीर्द कलंकित केली. एकंदरीत त्यांच्या कामकाजाचे “सर्वत्र कमिशन रुग्णांची सोय मात्र शून्य” हेच समीकरण असल्याचे त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवले.

डॉ. देसाई यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी डॉ. रामचंद्र शिवराम हंकारे यांची जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती, मात्र त्यांना वर्षभरातच या पदावरून हलवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या नव्या कार्यकाळाकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

ग्रामीण रुग्णालय जुन्नरच्या अधीक्षक डॉ. वर्षा डोईफोडे यांचा कार्यकाळ देखील वादग्रस्त राहिला असून जुन्नर हा आदिवासी व दुर्गम शेतकरी वर्गाचा भाग असल्याने येथे निवासी अधीक्षक म्हणून त्यांची उपस्थिती अपेक्षित असतानाही त्या जिल्हा शल्य चिकत्सक अधिकारी पुणे यांच्या औंध येथील कार्यालयातच कायमस्वरूपी बसूनच आरोग्य सेवा बजावत होत्या यासोबतच त्यांचा मुक्काम औंध येथील शासकीय बंगल्यातच असायचा  त्यांचे एकंदरीत कामकाज जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मेहरबानी ने उंटावरून शेळ्या हाकणे! या पद्धतीनेच होते, त्यांच्या एकूण कारभारा विरोधात अनेक तक्रारी होत्या. तथापि, या निष्क्रियतेनंतरही त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर या महत्त्वाच्या पदावर बदली मिळाली असून कुणाच्या “आशीर्वादामुळे प्रशस्तीपत्रक मिळाले ?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या बदल्यांमध्ये डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर यांची बदली सहाय्यक संचालक वैद्यकीय, ठाणे येथे करण्यात आली आहे. तसेच डॉ. दीपक साळुंखे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग, पुणे यांची बदली जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी, पुणे येथे करण्यात आली असून डॉ. भाग्यश्री थोपटे, वैद्यकीय अधीक्षक, लोणावळा यांना सहाय्यक संचालक, कुष्ठरोग, पुणे या पदावर नेमण्यात आले आहे.

आरोग्य विभागातील भ्रष्टाचार, लाचखोरी, निष्क्रियता आणि अनागोंदीमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेवर गदा येत असताना अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना कारवाईऐवजी बदलीच्या नावाखाली बक्षीस दिले जात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे प्रशासकीय कारणास्तव झालेल्या या बदल्यांमागे खरे कारण काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!