पुण्यासह राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर!
मतदान ५ फेब्रुवारीला!
मुंबई, दि.१३: राज्यातील मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची अखेर घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दि. १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक सूचनेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दि. १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ अशी असून उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत दि. २७ जानेवारी २०२६ आहे. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजेपर्यंत अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येऊन निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
या निवडणुकांसाठी दि. ०१ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असून मतदान दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. निवडणूक प्रचाराची सांगता मतदानाच्या २४ तास आधी करण्यात येईल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील या निवडणुकांसाठी एकूण २५ हजार ४८२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे.
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून या निवडणुका घेण्यात येणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाल्याने राज्याच्या ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा जोरदार हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.