जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्यावा – कृषि विभाग

पुणे,दि.१४: पुणे जिल्हा अंतर्गत कृषि विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार, सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध रासायनिक खतांचा एकूण 79440 मेट्रिक टन इतका आवश्यक साठा उपलब्ध आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

युरिया: 22109 मेट्रिक टन, डीएपी: 3277 मेट्रिक टन, एमओपी: 4519 मेट्रिक टन, संयुक्त खते: 37694 मेट्रिक टन, एसएसपी: 9708 मेट्रिक टन

कृषि विभागामार्फत शेतकरी बांधवांना एकाच प्रकारच्या खताची मागणी न करता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (Integrated Nutrient Management) करण्याची शिफारस करण्यात येत आहे. शेतजमिनीची कस व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार योग्य व संतुलित खतांचा वापर करावा. यामध्ये सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित समावेश असावा.

खते खरेदीसाठी ई-पॉस मशीन बंधनकारक – शेतकऱ्यांनी आधार कार्डासह खरेदी करावी

खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध करण्यासाठी खत कंपन्यांमार्फत नवीन ई-पॉस मशीनचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता खतांचा पुरवठा सुरळीतपणे होणार आहे. शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना ई-पॉस मशीनवरूनच खरेदी करावी, आधार कार्ड सोबत आणावे आणि अधिकृत पावती (बिल) घ्यावी. यामुळे बनावट खत विक्रीवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

खत विक्रेत्यांना महत्त्वाची सूचना

सर्व खत विक्रेत्यांना सूचित करण्यात येते की, ई-पॉस प्रणालीवरील साठा आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये विसंगती आढळल्यास ‘खत नियंत्रण आदेश, 1985’ अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्व दुकानदारांनी नियमित साठा नोंदी अद्ययावत ठेवाव्यात व ई-पॉस प्रणालीचा योग्य वापर करावा अश्या सूचना जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी दिल्या आहेत.

कृषी विभागामार्फत युरिया व डीएपी या खताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून संरक्षित साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यामध्ये युरिया 6500 मॅट्रिक टन तर डीएपी 900 मॅट्रिक टन इतका संरक्षित साठा (बफर स्टॉक) करणार आहेत. त्यापैकी आज अखेर 1600 मॅट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा करण्यात आलेलाअसून खरीप हंगाम 2025 साठी पुणे जिल्ह्यामध्ये 41713 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून त्यासाठी 48,257 क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषद, कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या खताची अथवा बियाण्याची तक्रार असेल तर आपल्या जवळच्या पंचायत समिती कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास संपर्क करा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!