देशी गोवंश संवर्धनासाठी राज्य सरकारचा ७१ कोटींचा निधी…

देशी गायीचं जतन म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण यासाठी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता प्रयत्न गरजेचे-  दत्तात्रय भरणे

पुणे,दि. २२ जुलै : “देशी गोवंशाचे संरक्षण व संवर्धन ही आपली सामाजिक व संस्कृतिक जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पुण्यात केले.

राज्य शासनाच्या वतीने देशी गाय संशोधन केंद्रासाठी ७१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, भविष्यातही आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पुणे येथील कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहा’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दराडे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री भरणे पुढे म्हणाले की, “देशी गायींविषयी समाजात प्रेम, आत्मीयता आहे. त्यामुळे या गोवंशावर आधारित संशोधन आणि माहितीप्रसार आवश्यक आहे. कृषी विद्यार्थ्यांनी या कार्यात पुढाकार घ्यावा आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी.”

यावेळी बोलताना अण्णा बनसोडे यांनी देशी गोवंशाबाबत आयोजित सप्ताहात मिळालेली माहिती उपयुक्त ठरेल, असे सांगून गोशाळांना भेटी देत त्यांच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करण्याची इच्छा व्यक्त केली.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे गोमातेला ‘राज्य माता’ म्हणून दर्जा देणारे पहिले राज्य असून, आयोगाच्या माध्यमातून गोवंशाच्या संगोपनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला १५ ते २५ लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे.

गोसंवर्धन, गोसंगोपन, गोपर्यटन, गोशाळा, गोमयमूल्यवर्धन, गोपालक, गोरक्षक, गोसाक्षरता यावर आधारित ‘गो-टेन’ उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना गौरविण्यात आले. येत्या काळात हे कार्य केवळ पारंपरिक श्रद्धेपुरते मर्यादित न राहता, त्यातून जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरणस्नेही शेतीचा प्रसार आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!