१०० दिवसांच्या मोहिमेत पुणे विभागाच्या कार्यालयांचा राज्यस्तरीय गौरव!
पुणे,दि.२५- महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम’च्या दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागातील विविध शासकीय कार्यालयांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विभागीय स्तरावरील या मूल्यांकनामध्ये उपसंचालक, भूमि अभिलेख, पुणे आणि उपसंचालक, पर्यटन, पुणे यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली कार्यक्षमता सिद्ध केली.
तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे, मुख्य अभियंता, महावितरण बारामती, आणि विभागीय आयुक्तालय, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
सहाय्यक संचालक, ग्रंथालय, पुणे, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, पुणे, अपर राज्यकर आयुक्त, राज्य वस्तू व सेवा कर, पुणे-२, आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली कार्यक्षमता अधोरेखित केली.
या मोहिमेअंतर्गत पारदर्शक कार्यालयीन प्रक्रिया, कार्यक्षम सेवा, नागरिकाभिमुख दृष्टिकोन, वेळेवर सेवा वितरण आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांसारख्या विविध निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. पुणे विभागातील या कार्यालयांनी सर्वच निकषांवर उत्तम कामगिरी केली.
या यशाबद्दल संबंधित विभागप्रमुखांसह त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे प्रशासनात सुधारणा घडून येत असून, नागरिकांना अधिक सक्षम व जलद सेवा मिळण्यास मदत होत आहे.