राज्यातील सर्व बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

राज्यातील बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण होणार, सोबतच महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याचे – परिवहन मंत्र्यांचे निर्देश 

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी – राज्यातील सर्व बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण (Security Audit) करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच, बसस्थानक आणि आगारांमध्ये असलेल्या निर्लेखित बसेस आणि परिवहन कार्यालयांकडून जप्त केलेली वाहने १५ एप्रिलपर्यंत निष्कासित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसस्थानकांवरील सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या दालनात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस अपर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी, परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व प्रभारी व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी निर्देश दिले की, बसस्थानकांतील निर्लेखित बसेस हटवण्यासाठी ठरावीक कालमर्यादा निश्चित करावी आणि १५ एप्रिलपूर्वी ही कार्यवाही पूर्ण करावी. तसेच, राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपदावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे तातडीने सादर करण्याचेही त्यांनी सांगितले.

 

सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपाययोजना

परिवहन मंत्र्यांनी बसस्थानक आणि आगारांमध्ये सीसीटीव्ही प्रणाली अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित असावी. नव्या बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावा आणि जीपीएस प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावी. बसस्थानकांवरील सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने गस्त वाढवावी.

आगार व्यवस्थापकांनी आपले निवासस्थान आगारातच ठेवावे, जेणेकरून व्यवस्थापनावर २४ तास त्यांचे लक्ष राहील. बसस्थानकांवरील प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला ओळखपत्र देणे अनिवार्य करावे, जेणेकरून बनावट कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांची फसवणूक टाळता येईल.

 

सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी काटेकोर नियोजन

प्रत्येक आगारात येणाऱ्या बसेसची सुरक्षा रक्षकांकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. चालक आणि वाहकांनी आगारात आणलेली बस सोडताना ती पूर्ण बंद आहे याची खात्री करावी. तसेच, सर्व बसेसचे दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद असल्याची दक्षता घ्यावी.

बसस्थानकांवरील सुरक्षा रक्षकांनी परिसरात फिरणाऱ्या संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवावी आणि आवश्यक कारवाई करावी. प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये. प्रत्येक बसस्थानकात महिलांसाठी स्वच्छ, प्रशस्त आणि व्यवस्थित स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या स्वच्छतेचा वेळोवेळी आढावा घ्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!