बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना; वनप्रेमींना जंगलात एक अनोखा अनुभव घेण्याची संधी; सहभागासाठी अर्ज मुदत ५ मे पर्यंत…
कोल्हापूर, ३ मे: कोल्हापूर वन्यजीव विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुध्द पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिनांक १२ व १३ मे २०२५ रोजी राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणनेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी निसर्गप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि स्वयंसेवकांनी ५ मे २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस. एस. पवार यांनी केले आहे.
राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) व सागरेश्वर (जिल्हा सांगली) या दोन प्रमुख अभयारण्यात एकूण ३२ मचाणांवर प्राणीगणना केली जाणार आहे. चंद्रप्रकाशातील रात्री जंगलात थांबून, मचाणांवरून प्राण्यांचे थेट निरीक्षण व नोंद केली जाते. यामध्ये प्राण्यांचे दर्शन, त्यांच्या हालचाली, आवाज, वन्यजीवनाचे स्वरूप, जैवविविधता यांचे प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. त्यामुळे ही प्राणीगणना एक संस्मरणीय अनुभव ठरतो.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी कोल्हापूर वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahaforest.gov.in या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करून भरावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह तो अर्ज PDF स्वरूपात २ मे ते ५ मे २०२५ या कालावधीत census2025@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. याशिवाय इतर कोणत्याही स्वरूपात पाठवलेले अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत.
मचाणांची संख्या मर्यादित असल्याने अर्ज निवडीत ‘प्रथम ईमेल आलेला अर्ज – प्रथम संधी’ हे धोरण अवलंबले जाणार आहे. तसेच अर्जदाराची निवड झाल्यास रु. १०००/- इतकी नोंदणी फी भरावी लागेल. ही फी अर्ज मंजूर झाल्यानंतरच मागवली जाणार आहे.
प्राणीगणनेबाबत शंका अथवा अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कोल्हापूर वन्यजीव विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता – विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), विचारेमाळ, सदर बाजार, कोल्हापूर ४१६००३. दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६६९७३०, तसेच ई-मेल: census2025@gmail.com किंवा संकेतस्थळ: www.mahaforest.gov.in यावरून अधिक माहिती मिळवता येईल.
या प्राणीगणनेतून केवळ वन्यजीवनाविषयी जाणीवच वाढत नाही तर सामान्य नागरिकांचा वनविभागाशी सहभागही वाढतो. त्यामुळे निसर्गप्रेमी, अभ्यासक आणि स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.