शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; फळबाग लागवड योजनेतून अनुदानाची संधी!
पुणे, दि. ६: शेतकऱ्यांनी आधुनिक व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेतीकडे वळण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत आंबा, बोर, चिकू, पेरु, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, केळी, ड्रॅगनफ्रूट, अॅव्हाकॅडो, द्राक्षे, करवंद अशा विविध फळपिकांची लागवड करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार असून, शेतीतील स्थैर्यही वाढण्यास मदत होणार आहे.
फळबाग लागवडीत अनुदान आणि रोजगाराचे दुहेरी फायदे, या योजनेतून शेतकऱ्यांना निवडलेल्या फळपिकांसाठी लागणारी रोपे, खते, सिंचनाची साधने यावर शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यासोबतच मनरेगाच्या माध्यमातून लागवडीसाठी आवश्यक मजूर खर्चाची भरपाईही होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीच्या टप्प्यातील आर्थिक ओझे कमी होणार असून, ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि मार्गदर्शन, शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जमीन तयार ठेवून स्थानिक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे अर्जाची प्रक्रिया, लागवडीसाठी निवडायच्या फळपिकांची माहिती, अनुदानाचे निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी दिली जाईल. कृषी विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन व देखरेख याचीही सोय केली जाणार आहे.
जिल्हा कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, हवामानानुसार योग्य फळपिकांची निवड केल्यास कमी देखभालीत अधिक उत्पन्न मिळवण्याचा मार्ग खुला होतो. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही ही योजना उपयुक्त ठरू शकते.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा.