“वारी” शोध अंतःकरणाचा!

वारकऱ्यांची वारी म्हणजेच कलियुगातील शांतीचा मार्ग…

आजचा माणूस खूप चालतोय, विमानात, गाडीत, ऑफिसमध्ये, बाजारात… पण जीवनाचा बोध आणि आत्मशोधाच्या दिशेने जाणारी एकही पाऊलवाट सापडत नाही, या बाह्य भौतिक धावपळीला अंतःकरणाचा तळ सापडत नाही, कारण तो विसरतोय कुठे जायचं आहे! अशा वेळी ‘वारी’ ही केवळ धार्मिक प्रथा नसून, अस्तित्वाच्या शोधाची एक मौन यात्रा ठरते.

वारी म्हणजे पंढरपूरकडे चाललेली देहाची वाट आणि आत्म्याच्या दिशेने वळलेली मनाची चाल. ज्ञानेश्वरांनी टाकलेली तात्त्विक बीजं, नामदेवांनी ओतलेला भक्तिरस, तुकारामांनी रुजवलेला व्यवहारातला अध्यात्माचा वृक्ष आणि बहिणाबाई, मुक्ताई, चोखामेळ्यांनी घालून दिलेली सहजतेची भाषा — हे सारं वारीमध्ये एकत्र साकार होतं.

संपूर्ण समाज कलियुगात तंत्रज्ञानाच्या शिखरावर पोहोचलेला असताना, माणसाचे अंतःकरण मात्र अधिक अस्वस्थ, अधिक तणावग्रस्त होत चालले आहे. विज्ञान, माहिती, आणि प्रगती यांचा कितीही भडीमार झाला तरी मानवी मनाला शांतीचा ठाव लागत नाही. या अस्थिरतेच्या, गोंधळाच्या, आणि व्यस्ततेच्या युगातही हजारो-लाखो पावले दरवर्षी एकाच दिशेने चालतात पंढरपूरच्या विठोबाच्या दिशेने. ती फक्त चाल नाही; ती आत्मशोधाची वाट असून “ती म्हणजे वारी !”

वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा अनमोल ठेवा आहे. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्वज्ञान दिलं आणि नामदेवांनी त्या संप्रदायात भावनिक ओलावा निर्माण केला. कर्मकांडांपेक्षा श्रेष्ठ असा नामस्मरणाचा जो मार्ग त्यांनी दाखवला, तो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर टाळ-चिपळ्यांच्या साथीनं नादतो “राम कृष्ण हरी…”

कलियुग म्हणजे वेग, माहिती, आणि स्वार्थाच्या चक्रव्यूहात अडकलेलं मानवी जीवन. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आपल्याला सुखाच्या सुविधा दिल्या असल्या, तरी अंतःकरणातील शांती हरवत गेली आहे. अशा वेळी, शतकानुशतक टिकून राहिलेली वारी ही केवळ परंपरा नसून ती एक आत्मिक परिक्षणाची तपश्चर्या आहे.

वारी म्हणजे पंढरीच्या दिशेने चालणारी पावले आणि मनाच्या दिशेने चाललेली अंतर्मुखता. ही वाट विठ्ठलापर्यंत जाते, पण खरंतर ती आपल्याला स्वतःशीच जोडते.

संत तुकाराम म्हणतात; “आळस पराधीनता दोन्ही चोर गेली, नाम घेतले मुखी लागली जीभ निघेना.” म्हणजेच वारीत आळस नाही, तक्रार नाही, अपेक्षा नाही, फक्त नामस्मरण. टाळ, मृदंग, अभंग आणि “राम कृष्ण हरी” चा अखंड जप. हे म्हणजे कलियुगात “माइंडफुलनेस”चे सर्वोच्च साधन.

वारी ही केवळ एक अध्यात्मिक घटना नाही. ती आहे समतेची, शुद्धतेची आणि नीतिमूल्यांची प्रयोगशाळा. संत चोखामेळा यांनी अनुभवलेल्या अस्पृश्यतेचा वेदना-अनुभव अभंगातून प्रकट केला. आजही जात, धर्म, भाषा, वर्ग यांचे कुंपण मनात असले, तरी वारीत सर्वांनाच एका ओवीचा, एका पंक्तीचा आणि एका वारीचा हक्क आहे, ते म्हणतात “मी अवर्ण, मी अपवित्र, तुज पाहुनि झालो पवित्र.”

“वारी म्हणजे आचरणात उतरलेला संतविचार”; आज आपण संतविचार ‘कोट्स’ म्हणून वापरतो  वाचनात, भाषणात, पोस्टमध्ये. पण वारकरी त्यांचा अनुभव घेतो पावलोपावली, श्वासाश्वासात.

संत बहिणाबाई म्हणतात, “साधूंची शिकवण, आई-वडिलांची वाण, उगाळून घ्या मनामध्ये.”

वारी हेच तर करते; ती तुमचं मन उगाळते, चाळते, सत्त्व वेचते आणि आचरणात शुद्धता आणते.

संत तुकाराम म्हणतात,”जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, पोटी बसावे गुन्ह्यावरी.”

वारीत ‘व्यवहार’ आहे, पण ‘उत्तम’ आहे. कोणतीही स्पर्धा नाही. तिथं सेवा आहे, सहकार्य आहे. कोणताही स्वार्थ नाही. केवळ समर्पण.

आजच्या समाजात ‘सहिष्णुता’, ‘बंधुत्व’, ‘नीती’ या संकल्पना शब्दकोशात सापडतात; परंतु कृतीत नाहीत, यावर वारी मनात विवेक जागा करते. कोणाशीही भांडायचं नाही, द्वेष बाळगायचा नाही, परधन, परनारी, परकीर्ति यांच्याबद्दल आसक्ती नाही, ही सारी जीवनाची तत्वं, वारी ‘उरावर’ शिकवत नाही, वाटचालीतून शिकवते.

आज मानसशास्त्र, मेडिटेशन, लाइफ कोचिंग, मोटिवेशनल स्पीचेस यांचा बाजार मांडलेला आहे. पण ‘वारी’ म्हणजे मुक्त मेडिटेशन. टाळ, मृदुंग, नामजप, आणि समूहचिंतन यातून मेंदूला विश्रांती, हृदयाला समाधान आणि आत्म्याला ओळख मिळते. आधुनिक मानसोपचारशास्त्राने ज्या तत्त्वांना आधुनिक नावं दिली, त्यांचा अनुभव वारकरी हजार वर्षांपासून घेतोय.

थोडक्यात ही वारी तुमचं मत बदलते. दृष्टिकोन बदलते. अहंकार गळवते. आणि तुम्हाला पुन्हा “माणूस” बनवते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!