राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्त पुणे व छत्रपती संभाजीनगर द्विविभागीय सन्मान सोहळा…
मत्स्यबीज उत्पादन ते मत्स्यपर्यटन सर्व क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान!
पुणे, दि. ७ जुलै (सत्यउपासक) –
मत्स्यव्यवसायात कौशल्य, मेहनत व चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मच्छिमार, मत्स्यशेती व्यावसायिक, उद्योजक आणि सहकारी संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘द्विविभागीय मत्स्यव्यवसायिक सन्मान सोहळा – २०२५’ पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे होणार असून, पुणे व छत्रपती संभाजीनगर या दोन विभागांतील नामांकित मत्स्यव्यवसायिकांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
मत्स्यव्यवसायातील कौशल्य आत्मसात करून कठोर परिश्रमाने, कष्टाने व नेटाने व्यवसाय करणाऱ्या मच्छिमार, मत्स्यशेतकरी आणि मत्स्यव्यवसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यवसायामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे ही काळाची गरज बनली आहे. हीच बाब लक्षात घेऊन पुणे मत्स्यव्यवसाय विभागाने २०२३ पासून राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनाच्या निमित्ताने सन्मान सोहळ्याची सुरुवात केली असून, यंदा हे उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच विभागीय पातळीवरील पुरस्कार सोहळा द्विविभागीय स्वरूपात होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था व कंपन्यांचा गौरव करण्यात येणार असून प्रत्येक पुरस्कार श्रेणीसाठी एक याप्रमाणे सन्मानार्थी निवडला जाणार आहे.
एकूण २० विविध क्षेत्रांमध्ये सन्मान करण्यात येणार असून, त्यामध्ये मत्स्यबीज उत्पादन, मासेमारी, मत्स्यशेती, केज कल्चर, बायोफ्लॉक, शोभिवंत मत्स्यपालन, मत्स्यखाद्य निर्मिती, शितसाखळी व्यवस्थापन, मत्स्यविपणन, नाविन्यपूर्ण उद्योजक, रिव्हर रॅन्चिंग, मत्स्यपर्यटन, सहकार, सामाजिक योगदान, प्रचार व प्रसार तसेच अधिकारी/कर्मचारी यांच्या योगदानाचा यामध्ये समावेश आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या नव्या संधी व फायदे याबाबतही जनजागृती केली जाणार आहे. त्यामुळे पुणे व छ. संभाजीनगर विभागातील जास्तीत जास्त मत्स्यव्यवसायिकांनी, संस्था व उद्योजकांनी या सन्मान सोहळ्यात सहभागी व्हावे, तसेच अधिक माहितीसाठी ८७८८०९१६४९ व ९६६५६३२७९३ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त (मत्स्य व्यवसाय विभाग) श्री. विजय शिखरे यांनी केले आहे.