बप्पा तुझ्या नावाने जत्रा सजली पण श्रद्धेचा बाजार मांडल्याने भक्ती भावनांची लूट झाली!
सत्यउपासक विशेष: मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली असून गणेशोत्सव मंडळांकरिता शासनाने आदेश काढून ड्रोन शो, स्मृतिचिन्हे, डाक तिकीट, ऑनलाइन प्रसारण, स्पर्धा आणि मंडळांसाठी निधी अशा विविध उपक्रमांचा आराखडा जाहीर केला. सरकारकडून पोलीस सुरक्षा आणि अकरा कोटी अनुदानाचीही तरतूद करण्यात आली असून वरकरणी हे सर्व ऐकताना अभिमान वाटावा असे असले आणि सरकारने “राज्योत्सव” म्हणून गणेशोत्सव अधिकृत केला असला, तरी प्रचलित वास्तव वेगळेच दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सवाला एक वेगळीच ओळख असून लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यामागे एकच उद्देश होता, तो म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणे, परस्परांमध्ये एकोपा निर्माण करणे आणि परकीय सत्तेविरोधात लोकांना सजग करण्यासाठी सामूहिक व्यासपीठ तयार करणे. शतकभराहून अधिक काळ या उत्सवाने महाराष्ट्राच्या सामाजिक-धार्मिक जीवनात एक वेगळं स्थान निर्माण केलं, परंतु आजच्या वास्तवाकडे पाहिलं तर टिळकांच्या या उद्दिष्टांपासून हा उत्सव दूर सरकत असल्याचं स्पष्ट जाणवतं!
गणेशोत्सव हा मूळतः सर्वांसाठी समानतेने खुला असावा, हा हेतू स्पष्ट असतानाही वास्तवात मात्र प्रचंड भेदभाव दिसून येतो, जसे मुंबईतील लालबागच्या राजासारख्या मोठ्या मंडळांत सेलिब्रेटींसाठी विशेष प्रवेश, व्हीआयपी दर्शन, स्वागत सत्कार आणि पाच-पाच मिनिटांचे फोटोसेशन त्यांच्याकरिता उजव्या पायाचे खास दर्शन तर सामान्य भक्तांना फक्त डाव्या पायाचे दर्शन! गणपतीच्या पायाशीच जर समाजातल्या श्रीमंत-गरीबांचा भेदभाव उभा केला जात असेल, तर ही अवस्था पाहून गणपतीलाच काय वाटत असेल? मुळातच गणेशोत्सव भेदभाव संपुष्टात करण्यासाठी आणि इंग्रजांच्या विरोधात एकजूट निर्माण करण्यासाठी सुरू केला परंतु याच उत्सवातून आपण मूळ उद्देशाला किनारा केला असून एका बाजूला सेलिब्रेटींसाठी अर्पण, प्रकाशझोत आणि मानमरातब, तर दुसरीकडे सामान्य भाविकांची तासन्तास रांगेत हेळसांड हा न्याय आहे का?
आज उत्सवाचे केंद्र सामान्यांचा बप्पा नसून जाहिरातबाजी, प्रायोजकांचे बॅनर, डीजेच्या प्रचंड आवाजात थिल्लर गाणी, आणि त्याच गोंगाटात हरवलेली भक्ती अशी दुर्दैवी अवस्था झाली आहे. मंडपात लहान मुलं, महिला आणि वृद्ध मंडळी उपस्थित असतानाही मोठ्या आवाजात धिंगाणा घालणं म्हणजे संस्कृतीला हरवणं असून टिळकांनी एकोप्याचा उत्सव दिला होता; परंतु आपण त्याला बाजारपेठेच्या जाहिरातींचा आणि उत्पन्नाचा उत्सव करून टाकलाय का? हा प्रश्न पडतो.
या एकंदरीत वस्तुस्थितीवर चार ओळी सुचतात त्या अशा
पाहुनी मन माझे नास्तिक झाले! देवा चमकोगिरीच्या दुनियेत तुझ्या मंदिरात आता भक्तीला मोल नाही, तुझ्या मंदिराच्या पायऱ्यांवर,भावनांचे तुकडे झाले, गोरगरीब भक्तांच्या आशा तुटल्या, मात्र श्रीमंतांचे मान चढले, आणि गरीबांचा भाव मनात दाटला,पैशाच्या या बाजारात खरा भक्त कुठे हरवला?
जर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने “राज्य महोत्सव” व्हायचा असेल, तर तो प्रत्येकासाठी समान, सुलभ आणि भक्तिमय वातावरणात झाला पाहिजे. दर्शनाच्या रांगेत कुणालाही कमीपणा नको, कोणासाठी विशेष दारे नकोत. संस्कृतीची ओळख म्हणजे साधेपणा, भक्तिभाव, एकोप्याचा अनुभव. जर आपण या उत्सवाला प्रायोजक, आरास आणि सेलिब्रेटींच्या प्रदर्शनापुरता मर्यादित केलं, तर आपल्या संस्कृतीचा आत्माच लुप्त होईल.
राज्य सरकारने केवळ आदेश काढून किंवा स्मृतिचिन्हे जाहीर करून जबाबदारी संपली असं समजू नये. खरी जबाबदारी आहे ती म्हणजे गणेशोत्सवाला पुन्हा लोकमान्य टिळकांच्या ध्येयाशी जोडणं, भक्तीला प्रतिष्ठा देणं, सर्वांना समानतेने सहभागी करून घेणं आणि संस्कृतीचे मोल टिकवणं. अन्यथा “राज्योत्सव” ही पदवी केवळ कागदोपत्री राहील आणि हा उत्सव आपल्या समाजाला एकवटण्याऐवजी आणखी विभागण्याचं काम करेल.