बाप्पा तुझ्या नावाने उत्सव सजला मात्र श्रद्धेचा बाजारात भक्ती भावनांची लूट झाली !
गणराय माझ्या स्वप्नात आले…
उत्सवातील श्रीमंतीचा आणि श्रद्धेचा बाजार पाहुनी गणरायाचे मन व्याकुळ झाले; गणरायांच्या मागे कैलासाचे दृश्य दिसू लागले!!!
शंकर, पार्वती, गणेश आणि कार्तिक स्वामी एकत्र बसले होते;
नंदी शांत उभा होता, वाघ त्याच्या जवळ होता,
उंदीर गणरायांच्या पायाशी होता, मोर कार्तिक स्वामीजवळ होता,
आणि महादेवांच्या गळ्यात नाग विसावला होता.
ज्यांच्या स्वभावातच संघर्ष आणि शिकारीचे नाते,
ते कैलासात एकमेकांसोबत शांततेने नांदत होते.
गणपती म्हणाले—
“शंकर-पार्वतीच्या कुशीत मी वाढलो,
कार्तिक स्वामी माझा भाऊ, कैलास माझे घर झाले;
नंदी, वाघ, उंदीर, मोर—
स्वभावाने एकमेकांचे शिकारी, तरीही कैलासात एकोप्याने राहिले.
शंकराच्या गळ्यातला नागही त्यांच्यात वैर घेऊन बसला नाही,
मग माणसांनी जात-धर्माच्या नावाने मनामनांत भिंती का उभ्या केल्या?
ज्यांना निसर्गाने शिकवले सहजीवन,
त्या मानवाने माणुसकीचा धडा का विसरला?
यावर मी म्हणालो,
“देवा, कुठे तुझ्या नावाने नवे नियम,
कुठे ध्वनिक्षेपक आणि स्पीकरच्या भिंतीच्या वादातून माणुसकी वर हल्ला!!!
कुठे दर्शनासाठी रांगा, कुठे प्रवेशाचे प्रश्न,
कुठे उत्सवाच्या नावाने पैशांचा झगमगाट.
कुणी तुझ्यासाठी देणगी देतो,
कुणी तुझ्या नावाने प्रसिद्धी मिळवतो;
यावरती गणपती म्हणाले,
“माझ्या मूर्तीला सोन्याचा मुकुट चढविण्यापेक्षा
गरिबाच्या मुलाच्या शिक्षणाला हात द्या;
माझ्या मंडपावर लाखो रुपयांची रोषणाई करण्यापेक्षा
अंधारात असलेल्या घरात दिवा लावा;
माझ्यासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा
माणुसकीच्या कामात एक पाऊल पुढे टाका.
तिथेच मला शोधा,
तिथेच माझे खरे दर्शन होईल.”
मी पुन्हा विचारले,
“मग देवा, तुझा खरा भक्त कोण?”
गणराय हसले आणि म्हणाले,
“जो ऊन-पावसाची पर्वा न करता माझ्याकडे येतो तो भक्त आहेच;
पण जो जात-धर्म विसरून दुसऱ्याच्या दुःखात धावून जातो,
जो दुर्बलाच्या बाजूने उभा राहतो,
जो प्राणीमात्रावर प्रेम करतो,
जो आपल्या श्रद्धेचा अभिमान बाळगतो पण दुसऱ्याच्या श्रद्धेचा अपमान करत नाही—
तोच माझा खरा भक्त!”
गणरायांच्या डोळ्यांत करुणा होती.
ते म्हणाले,
“माझ्या नावाचा जयघोष करा, पण त्यात द्वेष नको;
माझी आरती करा, पण त्यात भेदभाव नको;
माझी मिरवणूक काढा, पण त्यात माणुसकी हरवू नका.
‘गणपती बाप्पा मोरया’ हा जयघोष
माणसांना जोडणारा असू द्या, तोडणारा नव्हे.”
एवढे बोलून गणराय अंतर्धान पावले
आणि माझी झोप अचानक उघडली.
समोर वर्तमानपत्र होते;
धर्म, निवडणूक, मंदिर, यात्रा, घोषणा आणि राजकीय आरोपांच्या बातम्या दिसत होत्या.
काही क्षण मी त्या बातम्यांकडे पाहत राहिलो…
आणि मनोमन म्हणालो—
“गणपती बाप्पा मोरया!
पण बाप्पा, तुझ्या नावाने
माणसामाणसांत भिंती उभ्या करणाऱ्यांपेक्षा
तुझ्या नावाने माणसांना जोडणारे हात
या देशाला अधिक हवेत!!!”
सत्यउपासक विशेष: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सवाला केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि लोकजागृतीचीही मोठी परंपरा लाभली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप देताना जनतेला एका व्यासपीठावर आणणे, सामाजिक एकोपा निर्माण करणे आणि ब्रिटिश सत्तेविरोधात जनजागृती घडवून आणणे, हा व्यापक हेतू पुढे ठेवला होता. महाराष्ट्र शासनानेही १४ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय काढताना टिळकांच्या जनजागृती आणि सामाजिक एकोप्याच्या भूमिकेचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
गणेशोत्सव मंडळांकरिता शासनाने आदेश काढून ड्रोन शो, स्मृतिचिन्हे, डाक तिकीट, ऑनलाइन प्रसारण, स्पर्धा आणि मंडळांसाठी निधी अशा विविध उपक्रमांचा आराखडा जाहीर केला. सरकारकडून पोलीस सुरक्षा आणि अकरा कोटी अनुदानाचीही तरतूद करण्यात आली असून वरकरणी हे सर्व ऐकताना अभिमान वाटावा असे असले आणि सरकारने “राज्योत्सव” म्हणून गणेशोत्सव अधिकृत केला असला, तरी प्रचलित वास्तव वेगळेच दिसून येत आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक गणेशोत्सव मंडळांकडे पाहिले की उद्योगपतींनी मोठ-मोठी मंडळे हायजॅक केलेले दिसतात भव्य जाहिरातफलक, प्रायोजकांचे ब्रँडिंग, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि प्रसिद्धीचा झगमगाट दिसत असून एखाद्या मंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळत असेल, तर त्या निधीचा स्रोत, वापर, जाहिरातदारांचा प्रभाव आणि मंडळाच्या सामाजिक कामाचे स्वरूप याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असून उत्सवाचे व्यापारीकरण होत असल्याचे खेदानी म्हणावे लागेल!
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सवाला एक वेगळीच ओळख असून लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यामागे एकच उद्देश होता, तो म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणे, परस्परांमध्ये एकोपा निर्माण करणे आणि परकीय सत्तेविरोधात लोकांना सजग करण्यासाठी सामूहिक व्यासपीठ तयार करणे. शतकभराहून अधिक काळ या उत्सवाने महाराष्ट्राच्या सामाजिक-धार्मिक जीवनात एक वेगळं स्थान निर्माण केलं, परंतु आजच्या वास्तवाकडे पाहिलं तर टिळकांच्या या उद्दिष्टांपासून हा उत्सव दूर सरकत असल्याचं स्पष्ट जाणवतं!
देवाच्या पायाशीच गरीब-श्रीमंत भेदा- भेद?
गणेशोत्सव हा मूळतः सर्वांसाठी समानतेने खुला असावा, हा हेतू स्पष्ट असतानाही वास्तवात मात्र प्रचंड भेदभाव दिसून येत असून ‘चरण स्पर्श’ आणि ‘मुख दर्शन’ अशा दोन स्वतंत्र दर्शन व्यवस्था मोठ मोठ्या मंडळांत दिसून येत आहेत, तसेच सेलिब्रेटींसाठी विशेष प्रवेश, व्हीआयपी दर्शन, स्वागत सत्कार आणि पाच-पाच मिनिटांचे फोटोसेशन त्यांच्याकरिता उजव्या पायाचे खास दर्शन तर सामान्य भक्तांना फक्त डाव्या पायाचे दर्शन! गणपतीच्या पायाशीच जर समाजातल्या श्रीमंत-गरीबांचा भेदभाव उभा केला जात असेल, तर ही अवस्था पाहून गणपतीलाच काय वाटत असेल? बाप्पाच्या चरणांशी माणूस समान असायला हवा; पण मंडपाच्या बाहेर पडताच पैसा, प्रतिष्ठा, ओळख आणि प्रसिद्धी यांचे वेगळे दरवाजे उघडत असतील, तर यामुळे सामाजिक समानतेचा प्रश्न उपस्थित होतो?
कारण गणपतीच्या मूर्तीसमोर उभा असलेला गरीब असो वा श्रीमंत या दोघांच्या हातातील फुलांची किंमत वेगळी असली तरी त्याच्या भक्तीची किंमत वेगळी असू नये, किंबहुना गरिबाच्या भक्तीचे पारडे श्रीमंताच्या पारड्यापेक्षा जडच असेल यात शंका नाही, तरीसुद्धा आजच्या स्थितीत ज्याच्याकडे मोठी ओळख नाही, ज्याच्याकडे प्रसिद्धी नाही, ज्याच्या मागे सुरक्षा व्यवस्था नाही, जो सामान्य कुटुंबातून आलेला आहे, म्हणून त्याला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असेल आणि दुसरीकडे प्रभावशाली व्यक्तींना सहज प्रवेश मिळत असल्याची भावना निर्माण होत असेल, तर गणेशोत्सवाच्या सामाजिक समतेच्या मूळ विचारासमोर आरसा धरायलाच हवा!!!
मुळातच गणेशोत्सव भेदभाव संपुष्टात करण्यासाठी आणि इंग्रजांच्या विरोधात एकजूट निर्माण करण्यासाठी सुरू केला परंतु याच उत्सवातून आपण मूळ उद्देशाला किनारा केला असून एका बाजूला सेलिब्रेटींसाठी अर्पण, प्रकाशझोत आणि मानमरातब, तर दुसरीकडे सामान्य भाविकांची तासन्तास रांगेत हेळसांड हा न्याय आहे का?
आज उत्सवाचे केंद्र सामान्यांचा बप्पा नसून जाहिरातबाजी, प्रायोजकांचे बॅनर, डीजेच्या प्रचंड आवाजात थिल्लर गाणी, आणि त्याच गोंगाटात हरवलेली भक्ती अशी दुर्दैवी अवस्था झाली आहे. मंडपात लहान मुलं, महिला आणि वृद्ध मंडळी उपस्थित असतानाही मोठ्या आवाजात धिंगाणा घालणं म्हणजे संस्कृतीला हरवणं असून टिळकांनी एकोप्याचा उत्सव दिला होता; परंतु आपण त्याला बाजारपेठेच्या जाहिरातींचा आणि उत्पन्नाचा उत्सव करून टाकलाय का? हा प्रश्न पडतो.
मंडपाच्या प्रत्येक कोपऱ्यावर जाहिरात, प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रायोजकाचे नाव, प्रत्येक कार्यक्रमात प्रसिद्धीचा झगमगाट आणि त्याचवेळी बाप्पाच्या दर्शनासाठी सामान्य माणसाची लांबच लांब रांगा ही विसंगती डोळ्यांना खटकते. गणेशोत्सव हा बाजारपेठ होऊ नये; तो समाजाला जोडणारा उत्सव राहावा, एवढीच अपेक्षा असून या एकंदरीत वस्तुस्थितीवर चार ओळी सुचतात त्या अशा
पाहुनी मन माझे नास्तिक झाले! देवा चमकोगिरीच्या दुनियेत तुझ्या मंदिरात आता भक्तीला मोल नाही, तुझ्या मंदिराच्या पायऱ्यांवर,भावनांचे तुकडे झाले, गोरगरीब भक्तांच्या आशा तुटल्या, मात्र श्रीमंतांचे मान चढले, आणि गरीबांचा भाव मनात दाटला,पैशाच्या या बाजारात खरा भक्त कुठे हरवला?
जर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने “राज्य महोत्सव” व्हायचा असेल, तर तो प्रत्येकासाठी समान, सुलभ आणि भक्तिमय वातावरणात झाला पाहिजे. दर्शनाच्या रांगेत कुणालाही कमीपणा नको, कोणासाठी विशेष दारे नकोत. संस्कृतीची ओळख म्हणजे साधेपणा, भक्तिभाव, एकोप्याचा अनुभव. जर आपण या उत्सवाला प्रायोजक, आरास आणि सेलिब्रेटींच्या प्रदर्शनापुरता मर्यादित केलं, तर आपल्या संस्कृतीचा आत्माच लुप्त होईल.
राज्य सरकारने केवळ आदेश काढून किंवा स्मृतिचिन्हे जाहीर करून जबाबदारी संपली असं समजू नये. खरी जबाबदारी आहे ती म्हणजे गणेशोत्सवाला पुन्हा लोकमान्य टिळकांच्या ध्येयाशी जोडणं, भक्तीला प्रतिष्ठा देणं, सर्वांना समानतेने सहभागी करून घेणं आणि संस्कृतीचे मोल टिकवणं. अन्यथा “राज्योत्सव” ही पदवी केवळ कागदोपत्री राहील आणि हा उत्सव आपल्या समाजाला एकवटण्याऐवजी आणखी विभागण्याचं काम करेल.
शेवटी; लोकमान्य टिळकांनी गणपतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणले होते; आपण त्याच गणपतीभोवती समाजाला आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये विभागत तर नाही ना? या प्रश्नासोबतच बाप्पाला सोन्याचा मुकुट चढवला म्हणून भक्ती मोठी होत नाही; गरीबाच्या डोळ्यातील अश्रू पुसले तरच उत्सव मोठा होतो. आज हा विचार करणे गरजेचे असून टिळकांचा गणपती एकोप्यात दिसला पाहिजे; जाहिरातींच्या प्रकाशात नव्हे, तर माणुसकीच्या प्रकाशात उजळला पाहिजे.