वारकऱ्यांची वारी म्हणजेच कलियुगातील शांतीचा मार्ग…
सत्यउपासक आषाढीवारी विशेष: आजचा माणूस खूप चालतोय, विमानात, गाडीत, ऑफिसमध्ये, बाजारात… पण जीवनाचा बोध आणि आत्मशोधाच्या दिशेने जाणारी एकही पाऊलवाट सापडत नाही, या बाह्य भौतिक धावपळीला अंतःकरणाचा तळ सापडत नाही, कारण तो विसरतोय कुठे जायचं आहे! अशा वेळी ‘वारी’ केवळ धार्मिक प्रवास नसून, अस्तित्वाच्या शोधाची एक मौन यात्रा ठरते.
वारी म्हणजे पंढरपूरकडे चाललेली देहाची वाट आणि आत्म्याच्या दिशेने वळलेली मनाची चाल, यामध्ये ज्ञानेश्वरांनी टाकलेली तात्त्विक बीजं, नामदेवांनी ओतलेला भक्तिरस आणि तुकारामांनी रुजवलेला व्यवहारातला अध्यात्माचा वृक्ष सोबतच बहिणाबाई, मुक्ताई, चोखामेळा कित्येक संतांनी विठू माऊलीला आईची उपमा देऊन आईला लेकराच्या मनातील प्रत्येक भावना न बोलताच कळतात तिला शब्दाची गरज नसते, म्हणूनच संतांनी भक्तीची अशी सहज, निरागस आणि प्रेममय भाषा शिकवली ज्यात कधी लाडिक हट्ट असतो, कधी प्रेमाचा रुसवा, कधी करुण विनवणी, तर कधी विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या जीवाची आर्त भेटीची आस व्यक्त होते, हीच खऱ्या अर्थाने वारी, निस्वार्थ भक्ती आणि संतपरंपरेची अमूल्य शिकवण असून संतांनी घालून दिलेली जात, धर्म, पंथ यापलीकडे विठ्ठलाशी एकरूप होऊन जगण्याचा अनुभव हे सारं वारीमध्ये एकत्र साकार होतं.
आज संपूर्ण समाज कलियुगात तंत्रज्ञानाच्या शिखरावर पोहोचलेला असताना, माणसाचे अंतःकरण मात्र अधिक अस्वस्थ, अधिक तणावग्रस्त होत चालले आहे. विज्ञान, माहिती, आणि प्रगती यांचा कितीही भडीमार झाला तरी मानवी मनाला शांतीचा ठाव लागत नाही. या अस्थिरतेच्या, गोंधळाच्या, आणि व्यस्ततेच्या युगातही हजारो-लाखो पावले दरवर्षी एकाच दिशेने चालतात पंढरपूरच्या विठोबाच्या दिशेने. ती फक्त चाल नाही; ती आत्मशोधाची वाट असून “ती म्हणजे वारी !”
वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा अनमोल ठेवा आहे. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्वज्ञान दिलं आणि नामदेवांनी त्या संप्रदायात भावनिक ओलावा निर्माण केला. कर्मकांडांपेक्षा श्रेष्ठ असा नामस्मरणाचा जो मार्ग त्यांनी दाखवला, तो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर टाळ-चिपळ्यांच्या साथीनं नादतो “राम कृष्ण हरी…”
कलियुग म्हणजे वेग, माहिती, आणि स्वार्थाच्या चक्रव्यूहात अडकलेलं मानवी जीवन. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आपल्याला सुखाच्या सुविधा दिल्या असल्या, तरी अंतःकरणातील शांती हरवत गेली आहे. अशा वेळी, शतकानुशतक टिकून राहिलेली वारी ही केवळ परंपरा नसून ती एक आत्मिक परिक्षणाची तपश्चर्या आहे.
वारी म्हणजे पंढरीच्या दिशेने चालणारी पावले आणि मनाच्या दिशेने चाललेली अंतर्मुखता, ही वाट विठ्ठलापर्यंत जाते, पण खरंतर ती आपल्याला स्वतःशीच जोडते.
संत तुकाराम म्हणतात; “आळस पराधीनता दोन्ही चोर गेली, नाम घेतले मुखी लागली जीभ निघेना.” म्हणजेच वारीत आळस नाही, तक्रार नाही, अपेक्षा नाही, फक्त नामस्मरण. टाळ, मृदंग, अभंग आणि “राम कृष्ण हरी” चा अखंड जप, हे सर्व म्हणजे कलियुगात “माइंडफुलनेस”चे सर्वोच्च साधन असून वारी केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक, राजकीय घटना, धर्मद्वेष आणि बाह्य जगातील गोंधळ यांपलीकडे जाऊन अंतर्मनातील कलह, गोंगाट आणि अशांतता शांत करणारी आध्यात्मिक साधना आहे. ती मनाला स्थैर्य, शांतता आणि निश्चलता प्रदान करत आत्म्याला विठ्ठलाशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवते.
वारी ही केवळ जुन्या रूढी-परंपरा पाळणाऱ्या किंवा अशिक्षित, दुर्लक्षित जनसमुदायाची परंपरा नाही; तर ती समता, शुद्धता, बंधुता, नीतिमूल्ये आणि मानवतेची शिकवण देणारी, स्वतःचा शोध घेऊन परमार्थ आणि मोक्ष साधून अनंतात विलीन होणारी संतांची पायवाट असून आजही जात, धर्म, भाषा, वर्ग यांचे कुंपण मनात असले, तरी वारीत सर्वांनाच एका ओवीचा, एका पंक्तीचा आणि एका वारीचा हक्क असून येथे जाती, पंथ, पद, प्रतिष्ठा आणि संपत्तीचे भेद विरघळून प्रत्येक वारकरी हा “माऊली” बनतो.
एकीकडे संत चोखामेळा यांनी अनुभवलेल्या अस्पृश्यतेचा वेदना आपल्या अभंगातून व्यक्त करताना म्हणतात;
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥ नदी डोंगी परी जल नोहे डोंगे । काय भुललासी वरलिया रंगे ॥ चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥; तर दुसरीकडे ते म्हणतात “मी अवर्ण, मी अपवित्र, तुज पाहुनि झालो पवित्र.” अशी ही संतांची शिकवण देणारी वारी!
“वारी म्हणजे आचरणात उतरलेला संतविचार”; आज आपण संतविचार केवळ ‘कोट्स’ म्हणून वाचनात, भाषणात, पोस्टमध्ये वापरतो पण वारकरी ते आचरणात आणून पावलोपावली, श्वासाश्वासात त्यांचा अनुभव घेतो.
संत बहिणाबाई म्हणतात, “साधूंची शिकवण, आई-वडिलांची वाण, उगाळून घ्या मनामध्ये.” आणि वारी हेच तर करते; ती तुमचं मन उगाळते, चाळते, सत्त्व वेचते आणि आचरणात शुद्धता आणते.
संत तुकाराम म्हणतात, “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे.” या ओळीचा गाभा असा की, व्यवहार असावा; पण तो उत्तम, प्रामाणिक आणि मूल्याधिष्ठित असावा, वारीतही व्यवहार आहे, मात्र तो स्पर्धा, लोभ, हाव, तिरस्कार आणि राग यांच्या पलीकडचा असून येथे निस्वार्थ सेवा, अतूट विश्वास, आत्मसमर्पण, निस्सीम भक्ती, परस्पर सहकार्य आणि सर्व भेदभाव विसरून एकमेकांना माऊली मानण्याची संस्कृती अनुभवायला मिळते, म्हणूनच वारी हा केवळ प्रवास नसून उत्तम व्यवहार, मानवता आणि अध्यात्म यांचा आत्मबोधाचा अनुभव आहे.
आजच्या समाजात ‘सहिष्णुता’, ‘बंधुत्व’, ‘नीती’ या संकल्पना शब्दकोशात सापडतात; परंतु कृतीत नाहीत, यावर वारी मनातील विवेक जागा करते, कोणाशीही भांडायचं नाही, द्वेष बाळगायचा नाही, परधन, परनारी, परकीर्ति यांच्याबद्दल आसक्ती नाही, ही सारी जीवनाची तत्वं, वारी ‘उरावर’ शिकवत नाही तर वाटचालीतून घडवते!
आज सर्वत्र लाखो रुपयांची फी घेऊन मानसशास्त्र, मेडिटेशन, लाइफ कोचिंग, मोटिवेशनल स्पीचेस यांचा बाजार मांडलेला दिसतो, पण ‘वारी’ म्हणजे कोणतीही फी, जाहिरात किंवा अपेक्षा न ठेवता मुक्त मेडिटेशन असून टाळ, मृदुंग, नामजप, आणि समूहचिंतन यातून मेंदूला विश्रांती, हृदयाला समाधान आणि आत्म्याची ओळख देणारी संत परंपरा असून वारी ही माणसाला स्वतःच्या अंतरंगाशी जोडणारी, अहंकार विरघळवणारी, समता, सेवा आणि भक्तीची शिकवण देणारी अशी अनोखी जीवनशाळा आहे, जिथे ज्ञान विकले जात नाही, तर ते आचरणातून जगायला शिकवले जाते, शेवटी म्हणूनच म्हणावे लागेल; मानसोपचार तज्ञांनी ज्या तत्त्वांना आधुनिक नावं दिली, त्यांचा अनुभव वारकरी हजार वर्षांपासून घेतोय!
थोडक्यात ही वारी तुमचं मत बदलते. दृष्टिकोन बदलते. अहंकार गळवते. आणि तुम्हाला पुन्हा “माणूस” बनवते.