Missing Link Goes Missing Again.

उद्घाटनानंतर अवघ्या ६६ दिवसांतच ‘कनेक्टिंग लिंक’ पुन्हा ठरली ‘मिसिंग लिंक’!

दरड कोसळल्याने मार्गिका बंद, खड्ड्यांनीही वाढवले प्रश्न?

सत्यउपासक वृत्त: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनावेळी त्यांनी या प्रकल्पाचा उल्लेख ‘कनेक्टिंग लिंक’ असा करत तो राज्याच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे प्रतीक असल्याचे सांगितले होते. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या ६६ दिवसांत, म्हणजेच ६ जुलै २०२६ रोजी पहाटे मुसळधार पावसामुळे खंडाळा एक्झिटजवळ बोगदा क्रमांक २ च्या बाहेरील भागात मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेत दरडीसोबत पुलाचा आणि स्लॅबचा काही भागही रस्त्यावर कोसळल्याचे समोर आले आहे. यासोबतच कित्येक ठिकाणी मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याच्याही घटना निदर्शनास आल्या असल्यामुळे उद्घाटनावेळी ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणून गौरविण्यात आलेला हा प्रकल्प अवघ्या दोन महिने पाच दिवसांतच पुन्हा एकदा ‘मिसिंग लिंक’ ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून ती पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून प्रशासनाकडून युद्धपातळीवर दरडीचा ढिगारा हटवून मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

दरड कोसळणे, पुलाचा व स्लॅबचा काही भाग कोसळणे आणि रस्त्यावर खड्डे पडल्याच्या घटनांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अभियांत्रिकी दर्जा, बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि दीर्घकालीन टिकाऊपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची प्रत्यक्ष कामगिरी आता संबंधित यंत्रणांसाठी कसोटीची ठरत असून, पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेबाबत अधिक कठोर तांत्रिक तपासणी आणि उत्तरदायित्वाची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!