अमित शाह यांच्या हस्ते सहकार क्षेत्रातील तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ!!!
पुण्यात सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू; ‘भारत टॅक्सी’ सेवेतून चालकांना मालकी हक्काची संधी!!!
तळेगावच्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी दीड हजार कोटी…
महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
पुणे, दि. १५ : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला औद्योगिक आणि आर्थिक बळ देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, तळेगाव येथील बंद पडलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी तब्बल १,५०० कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सहकारी साखर कारखाने, इथेनॉल प्रकल्प आणि दूध डेअरी उद्योगांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री देशांतर्गत तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याचबरोबर पुण्यात सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असून, सहकारी तत्त्वावर आधारित ‘भारत टॅक्सी’ सेवेचाही प्रारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचा समृद्ध वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
तळेगाव येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन, पुण्यात सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक (सीआरसीएस) यांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पुण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार संजय (बाळा) भेगडे आणि केंद्रीय सहकार सचिव आशिषकुमार भुटानी उपस्थित होते.
बंद पडलेल्या सहकार उद्योगाला दीड हजार कोटींचे बळ
तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही महत्त्वाची बहुराज्य सहकारी संस्था पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी आयडीएमसी आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून सुमारे १,५०० कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२७ मध्ये उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे.
या संस्थेमध्ये सहकारी साखर कारखाने, इथेनॉल प्रकल्प आणि दूध डेअरी उद्योगांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री तयार केली जाणार आहे. सध्या अशा प्रकारच्या यंत्रसामग्रीसाठी बाह्य स्रोतांवर अवलंबून राहावे लागणाऱ्या सहकारी संस्थांना देशांतर्गत उत्पादनाचा पर्याय उपलब्ध होईल. परिणामी, सहकार क्षेत्रातील औद्योगिक क्षमता वाढण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सहकार क्षेत्राने पारंपरिक व्यवसायांच्या चौकटीबाहेर पडून औद्योगिक उत्पादनातही सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील पश्चिम विभागीय कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाज सुलभ
सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक (सीआरसीएस) यांचे पश्चिम विभागीय कार्यालय पुण्यात सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम विभागातील बहुराज्य सहकारी संस्थांना प्रशासकीय आणि नियामक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. संस्थांच्या नोंदणीपासून विविध प्रशासकीय कामकाजापर्यंतच्या प्रक्रियांमध्ये सुलभता येण्याबरोबरच पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्राला सहकार क्षेत्राची मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विठ्ठलराव विखे पाटील आणि वैकुंठभाई मेहता यांसारख्या सहकारमहर्षींनी राज्यात सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या चळवळीचा अनुभव आणि वारसा देशातील इतर राज्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असून, पुण्यातील पश्चिम विभागीय कार्यालय या दिशेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
‘भारत टॅक्सी’त चालकच होणार मालक
पारंपरिक टॅक्सी सेवा व्यवस्थेत चालकांना आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा विविध प्रकारच्या कमिशनच्या स्वरूपात द्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर सहकारी तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ‘भारत टॅक्सी’ सेवा चालकांसाठी वेगळे आर्थिक मॉडेल उपलब्ध करून देणारी ठरणार आहे. या सेवेमध्ये टॅक्सीचालकांना म्हणजेच सारथींना सदस्यत्व, मालकी हक्क आणि आर्थिक भागीदारीची संधी देण्यात आली आहे.
या माध्यमातून चालक केवळ सेवा पुरविणारे घटक न राहता सहकारी संस्थेचे भागीदार आणि मालक म्हणून सहभागी होऊ शकतील. कमिशनविरहित व्यवस्थेमुळे चालकांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होण्याबरोबरच प्रवाशांनाही वाजवी दरात सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सहकाराच्या माध्यमातून परिवहन क्षेत्रात आर्थिक लोकशाही निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे शाह यांनी सांगितले.
सहकारी साखर कारखान्यांना करमाफीचा दिलासा – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या सहकार क्षेत्रातील निर्णयांचे स्वागत करताना महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांवरील गेल्या अनेक वर्षांपासूनचा सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा कर माफ करण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मदत झाली आहे.
तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्थेच्या पुनरुज्जीवनामुळे सहकारी साखर कारखाने आणि दूध डेअरी उद्योगांना आवश्यक यंत्रसामग्री देशातच उपलब्ध होईल. त्यामुळे सहकार क्षेत्राला स्वदेशी उत्पादनाचे बळ मिळेल. ‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून सारथींना मालकी हक्क मिळण्याची संधी उपलब्ध होत असून, सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आर्थिक सक्षमीकरण साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सहकारी संस्थेचे पुनरुज्जीवन रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचे – सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडसारखी महत्त्वाची सहकारी संस्था पुन्हा कार्यान्वित होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रकल्पामुळे शेकडो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासह राज्यातील सहकार क्षेत्राला औद्योगिक बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
सहकारी साखर कारखान्यांना करमाफी आणि मळीवरील कर कमी करण्यासारखे निर्णय सहकारी संस्थांसाठी दिलासादायक ठरले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी सातत्याने योगदान दिले. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू होत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
पुण्यातील कार्यालयामुळे पश्चिम विभागातील सहकार क्षेत्राला चालना – मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू होणे ही राज्यासाठी महत्त्वपूर्ण बाब असल्याचे सांगितले. या कार्यालयामुळे महाराष्ट्रासह पश्चिम विभागातील बहुराज्य सहकारी संस्थांना प्रशासकीय कामकाजासाठी मोठी मदत होणार असून, सहकार क्षेत्राच्या विस्ताराला चालना मिळेल.
नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्थेच्या पुनरुज्जीवनामुळे सहकारी साखर कारखाने, दूध डेअरी आणि इतर सहकारी संस्थांना आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे सहकार क्षेत्रातील उत्पादन क्षमता आणि औद्योगिक स्वावलंबन वाढण्यास हातभार लागेल, असे मोहोळ यांनी नमूद केले.
एनएचईसी आणि आयडीएमसीमध्ये सामंजस्यासाठी आशयपत्राची देवाणघेवाण
कार्यक्रमादरम्यान नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (एनएचईसी) आणि आयडीएमसी लिमिटेड यांच्यात सामंजस्याच्या दृष्टीने आशयपत्राची देवाणघेवाण करण्यात आली. तसेच ‘भारत टॅक्सी’च्या वतीने अशोककुमार मिश्रा, सुवर्णा सोनवणे, राजीव सुतार आणि दीपक विश्वकर्मा या चार सारथींना प्रतिनिधिक स्वरूपात समभाग प्रमाणपत्रांचे वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.