सत्यउपासक/पुणे: हडपसर येथील कमधेनू इस्टेट परिसरातील उषाकिरण सुपरस्पेशालिटी रुग्णालयात बुधवारी सापडलेल्या स्फोटकसदृश वस्तू प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला वेग दिला असून या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम १०९ (खून करण्याचा प्रयत्न) तसेच स्फोटक पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे.
बुधवारी सायंकाळी रुग्णालयातील स्वच्छतागृह परिसरात वायर, टाइमर आणि जिलेटिनसदृश साहित्य असलेली संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS), दहशतवाद विरोधी पथक (ATS) तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संशयास्पद वस्तू सुरक्षितरीत्या बाहेर काढून हडपसर ग्लायडिंग सेंटर परिसरात निकामी करण्यात आली. प्राथमिक तपासात ती ‘लो-ग्रेड आयईडी’ स्वरूपातील वस्तू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तपास यंत्रणांनी रुग्णालय आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रफिती ताब्यात घेतल्या असून एका दुचाकीस्वाराची हालचाल संशयास्पद असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने फुटेज अधिक स्पष्ट करण्याचे काम सुरू असून विविध कोनातून तपास केला जात आहे. काही व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते; मात्र त्यांच्याविरोधात अद्याप ठोस पुरावे समोर आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे हडपसर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तपास पूर्ण होईपर्यंत रुग्णालयातील संबंधित परिसर सील करण्यात आला असून स्फोटक साहित्याचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.